मुंबई पोलिसांनीही टोचले हार्दिक-राहुलचे कान - Majha Paper

मुंबई पोलिसांनीही टोचले हार्दिक-राहुलचे कान

hardik-patel
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर ‘कॉफी विथ करण’ या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. या बाबतची कारवाई बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने केल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेला या दोघांना मुकावे लागले आहे.

त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर या दोघांना बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण हार्दिकने त्यावर दिलेले स्पष्टीकरण पटलेले नसून दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी या दोन्ही खेळाडूंवर घालण्यात यावी, असा प्रस्ताव विनोद राय यांनी मांडला होता. पण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्या डायना एडलजी यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली.


त्यांच्यावर या प्रकरणानंतर सर्वच स्तरावर टीका होत असतानाच मुंबई पोलिसांनीदेखील त्यांचे कान टोचले आहेत. मुंबई पोलीसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या दोघांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुंबई पोलीसांनी आपल्या ट्विटमध्ये खरा सज्जन माणूस हा सर्वत्र सज्जनच असतो. (जागा पाहून तो आपली वर्तणूक चांगली – वाईट करत नाही) असा संदेश दिला आहे. तसेच त्यांनी या सोबत एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. महान खेळाडूचे लक्षण काय? यावर मैदानात धावा करणे आणि मैदानाबाहेर (जीवनात) महिलांचा आदर करणे असे त्यात लिहिले आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटला चांगलीच पसंती मिळत आहे.

Leave a Comment