सर्वोच्च न्यायालयाने दिले शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश

shivsmarak
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारकाचे काम सुरू करू नका, असे तोंडी निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश पर्यावरण संघटनांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात स्मारकाच्या कामाला अंतरिम स्थगितीच्या मागणीसाठी पर्यावरणवादी देबी गोयंकांच्या ‘कॉन्झर्व्हेशन अॅक्शन ट्रस्ट’ने धाव घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात शिवस्मारकाच्या अरबी समुद्रातील कामाला पर्यावरणविषयक परवानगी देणाऱ्या केंद्राच्या निर्णयाला जनहित याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले आहे. याचिका प्रलंबित असताना अंतरिम मनाई हुकूम देण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या १६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर हे शिवस्मारक उभारले जाणार आहे. चौपाटीपासून ही जागा ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणांहून बोटीच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

Leave a Comment