मोदींची अवस्था झाली आहे ‘गजनी’सारखी

dhananjay-munde
पालघर – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित निर्धार परिवर्तनाचा सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टिकत नाही. या लाटेने राज्याचे काय वाटोळे झाले, हे जनता अनुभवत असून २०१४ च्या निवडणूकीतील दिलेली आश्वासनेच मोदी विसरल्यामुळे त्यांची अवस्था ‘गजनी’सारखी झाली असल्याचे म्हटले आहे.

जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे त्याचा हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही. यामुळे अच्छे दिन आहेत का? असे विचारले तर सत्ताधारी आमदार, खासदारही हात जोडुन हसतात. ‘मै चौकीदार हू, मै सोता नहीं हु’ असे मोदींनी नागपूर येथे सांगितले. पण व्यासपीठावरच खरे चोर होते, अशी खिल्लीही मुंडे यांनी उडवली. परदेशात पळालेले माल्ल्या, नीरव आणि चौक्सी पोट धरुन हसत असतील, असा चिमटा त्यांनी काढला. मोदीनी २०१४ च्या निवडणूकीत केलेली भाषणे आणि आजची त्यांची भाषणे एकल्यानंतर गजनी चित्रपटाची आठवण येते. मोदींनी दिलेली आश्वासनेच ते विसरले यामुळे नरेंद्र मोदींची अवस्था गजनी सारखी झाल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.

स्थानिक प्रश्नांना हात घालत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानसेवा शेकडो रेल्वे असताना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कशाला हवी?, असा सवाल केला. फक्त पुतळ्यावर खर्च करणारे हे सरकार शेतकरी कामगारांकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

या सरकारकडे सहन करण्याची ताकद नसून ते माध्यमे, साहित्यिक आणि विरोधी पक्षावर दादागिरी करून गळचेपी करत आहेत. मात्र, दादागिरीचे दिवस लवकर संपतात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. मी बोललो तर मलाही जेलमध्ये टाकले. कारण, १०० कोटींच्या महाराष्ट्र सदनात ८०० कोटींचा घोटाळा केल्याची ते आरोप करतात. ५ फुटाच्या म्हशीला १५ फुटाचे रेडकु कसे होईल? असा सवाल भुजबळांनी यावेळी केला. सरकार आदिवासींच्या विरोधातले असून, अजूनही आदिवासींना वनवासी सांगणारी ही माणसे आहेत. आम्ही वनवासी नसुन आदिवासी आहोत हे सांगण्याची वेळ आता आली असल्याचे छगन भुजबळांनी सांगितले.

या निर्धार परिवर्तनाचा सभेत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार आनंद ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील तसेच जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment