मोदी-शाहांची झोप उडवणारी ‘सपा-बसप’ची पत्रकार परिषद

combo
लखनऊ: देशभरातील विविध पक्षांची लोकसभा 2019 निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असून उत्तर प्रदेशातील कट्टर विरोधक मायावती आणि अखिलेश यादव हे दोघेही एकत्र आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्षाने युतीची घोषणा केली. आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोघांनीही आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

ही पत्रकार परिषद मोदी-शाह या गुरु चेल्याची झोप उडवणारी असून जनतेची भाजपकडून दिशाभूल झाली. शेतकऱ्यांसह सर्वांचेच या हुकूमशाही सरकारकडून नुकसान झाले आहे. सपा-बसपा लोकभावना म्हणून एकत्र येत आहे. आगामी लोकसभा निवडणूक सपा-बसपा एकत्र लढेल, असे मायावती यांनी म्हटले आहे.

मायावतींनी याशिवाय राफेल घोटाळ्यामुळे भाजपची सत्ता जाणार असल्याचे भाकीत वर्तवले. मायावतींनी यावेळी भाजपसह काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच माळेचे मणी असून दोघांनीही भ्रष्टाचार केला. घोषित आणीबाणी काँग्रेसने लादली तर अघोषित आणीबाणी भाजपकडून सुरु असल्याचे मायावती म्हणाल्या.

भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणताही फरक नाही. काँग्रेसचा बोफोर्स घोटाळा प्रकरण आहे तर भाजपचा राफेल घोटाळा आहे. दोन्ही सरकारमध्ये संरक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचे मायावती म्हणाल्या. काँग्रेस-भाजप दोघांच्याही काळात महागाई, भ्रष्टाचार, गरिबी वाढली असा आरोप मायावतींनी केला.

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून लोकसभेच्या येथे सर्वाधिक 80 जागा आहेत. भाजपने गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 72 जागा जिंकल्यामुळे सपा-बसपाने यंदा एकत्र येत भाजपला रोखण्याचे ठरवले आहे. सपा आणि बसपा दोघेही आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 38-38 जागा लढवणार आहेत. तर इतर पक्षांना 4 जागा सोडणार आहेत. त्यापैकी अमेठी आणि रायबरेली या जागा अन्य पक्षांना सोडण्यात येतील.

Leave a Comment