पांड्या-राहुल झटका देण्याच्या तयारीत बीसीसीआय

hardik-pandya
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वगळण्यात आलेले क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना आणखी मोठा झटका बसू शकतो. पांड्या आणि के एल राहुल यांच्यावर दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर छी थू होत आहे. आता त्यांच्यावर थेट एकदिवसीय विश्वचषकातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्याची कारवाई होऊ शकते. तसे संकेत क्रिकेट प्रशासक समितीच्या सदस्य डायना इडुल्जी यांनी दिले आहेत.

पांड्या आणि राहुलला डायना इडुल्जी यांच्याच शिफारशीनंतर पुढील कारवाईपर्यंत एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यांनी या शिफारशीपूर्वी कायदेशीर सल्ला घेतला होता. या दोघांनी त्यावेळी शिस्तभंगाच्या नियमाचे उल्लंघन केले नाही, असे लॉ फर्मने सांगितल्यानंतर चौकशीसाठी या दोघांच्या निलंबनाची शिफारस डायना इडुल्जी यांनी केली. त्यानंतर दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले.

इडुल्जी याबाबत अधिक माहिती देताना म्हणाल्या, याप्रकरणी बीसीसीआय समितीची स्थापना करुन शिक्षेची मर्यादा निश्चित करेल. इडुल्जी यांना यावेळी पांड्या आणि राहुल 30 मेपासून सुरु होत असलेल्या विश्वचषकातही खेळू शकणार नाहीत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इडुल्जी म्हणाल्या, हो तसे देखील होऊ शकते.

पांड्या आणि राहुल यांचे वक्तव्य अतिशय लाजिरवाणे असल्याचे इडुल्जी यांनी नमूद केले. असे वक्तव्य महिलांबाबत करणे हे अत्यंत घाणेरडे आहे. लहान मुलांचे क्रिकेटर्स हे रोल मॉडेल असतात. त्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयची प्रतिमा मलिन झाली.

Leave a Comment