पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलिवूडमधील काही कलाकारांनी भेट घेतली. विविध विषयांवर या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी कलाकारांसोबत चर्चा केली. या भेटीविषयीची माहिती दिग्दर्शक करण जोहरने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर करुन दिली आहे. केंद्र सरकारने चित्रपटाच्या तिकिटांवरील जीएसटी कपातीचा घेतलेल्या निर्णयाबद्दल कलाकारांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
चित्रपट कलाकारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला. रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, आयुष्मान खुराणा, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, एकता कपूर, राजकुमार राव, भूमी पेडणेकर, रोहित शेट्टी आणि विकी कौशल या फोटोत दिसत आहे.
बॉलिवूडच्या कलाकारांना दिल्लीत भेटण्यासाठी मोदींनी बोलावले होते. भारतीय संस्कृतीवर बॉलिवूड चित्रपटांचा काय परिणाम पडतो. तसेच चित्रपटांच्या माध्यमातून देशाला काही संदेश देऊ शकतो. त्याचबरोबर देशाच्या विकासाबद्दल कलाकारांची भूमिका काय असेल आणि चित्रपटांचा समाजावर कसा परिणाम होईल यावर चर्चा करण्यात आली. ही बैठक करण जोहर आणि महावीर जैन यांनी आयोजित केली होती.