तंत्रद्यानाचा उत्कृष्ट वापर, उत्तम कथानके आणि कमाईच्या बाबतीत हॉलीवूडचे चित्रपट बॉलीवूडच्या तुलनेमध्ये चार पावले पुढेच असतात. दर वर्षी प्रदर्शित होणारे अनेक हॉलीवूड चित्रपट भारतामध्येही अतिशय लोकप्रिय होत असतात. पण असे उत्तम हॉलीवूड चित्रपट पहात असतानाच आपल्या बॉलीवूडमध्ये ही असेच अव्वल दर्जाचे चित्रपट बनविले जावेत ही भारतीय दर्शकांची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करणारे ‘दंगल’ सारखे चित्रपट येतातही, पण हे चित्रपट चालण्यामागचे मुख्य कारण कथानक आणि कलाकारांचा अभिनय, हे असते. मात्र, अतिशय प्रगत अश्या व्हीएफएक्स आणि इतर तंत्रज्ञानांच्या वापराच्या बाबतीत मात्र बॉलीवूड अजून मागेच आहे. तश्यातच यंदाच्या वर्षीही अनेक हॉलीवूड चित्रपट बॉलीवूडमध्ये धमाका उडवून देण्याच्या तयारीत आहेत. बॉलीवूडमध्येही आमिर खानचा ‘महाभारत’ ही या वर्षी येणार असून, या चित्रपटावर एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी आमिरच्या ‘महाभारत’ ला स्पर्धा देणारे कोणते हॉलीवूड चित्रपट आहेत हे जाणून घेऊ या.
यंदाच्या वर्षी हॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिरोंचे आणि 4 डी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांमध्ये नवे तंत्रज्ञान वापरून अनेक नवे प्रयोग करण्यात आले असून, आधुनिक व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करून मार्व्हल स्टुडियोचा ‘अॅव्हेन्जर्स एंड गेम’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटावर तब्बल २५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच ‘फ्रोझन २’, ‘ द अँग्री बर्ड्स – २, ‘ द लेगो मूव्ही- २’, ‘ जुमानजी -३’, ‘टॉय स्टोरी -४’, इत्यादी मोठ्या बजेटचे हॉलीवूड चित्रपट यंदाच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
आमिरच्या ‘महाभारत’ स्पर्धेमध्ये उतरणार हे हॉलीवूडमधील महागडे चित्रपट
बजेटच्या बाबतीत बोलायचे झाले, तर यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणार असलेल्या ‘स्टार वॉर्स’चे बजेट २००० कोटी रुपयांचे आहे, तर ‘लायन किंग’चे बजेट १७०० कोटी रुपयांचे आहे. ‘टॉय स्टोरी-४’चे बजेट १५८२ कोटी रुपयांचे असून, ‘फ्रोझन-२’चे बजेट १२५८ कोटी रुपयांचे असणार आहे.