भावाच्या लग्नाला जाणार आदित्य ठाकरे

combo
मुंबई : 27 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा विवाह आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वतः लग्नाचे निमंत्रण दिले. पण लग्नाला अमित यांचे चुलत भाऊ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जाणार का, याबाबत तरुणांमध्ये चर्चा होती. पण मी लग्नाला नक्की जाणार असल्याचे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

तरुणाईमध्ये नेहमीच ठाकरे कुटुंबाची नवी पिढी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण असते. राजकारणात आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेही आता राजकारणात सक्रिय होत आहेत. पण ठाकरे कुटुंबीयांचे राजकीय संबंध टोकाचे असल्यामुळे कौटुंबिक संबंधांवरही याचा परिणाम जाणवतो.

अमितच्या लग्नाबद्दल प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, अमितच्या लग्नाला नक्की जाणार, जावेच लागणार, आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. सध्या अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे विविध नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लग्नाची पत्रिका दिली. राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्रिका देण्यासाठीही दिल्लीला जाणार होते, पण दिल्ली दौरा त्यांनी रद्द केला. 27 जानेवारी 2019 रोजी अमितचे लग्न मुंबईमधील लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत विवाहबद्ध होणार आहे.

Leave a Comment