पंजाबच्या भूगर्भशास्त्रज्ञ म्हणतात, डायनॉसॉर्सचा शोध ब्रह्मदेवाने लावला

brahma
नवी दिल्ली : पंजाब विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञाने डायनॉसॉरचा शोध सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाने सर्वप्रथम लावला, असा दावा केला आहे. ब्रह्मदेवाने वेदांमध्ये डायनॉसॉर्सची नोंद केल्याचे तर्कटही त्यांनी मांडले आहे.

पंजाब विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागात आशू खोसला हे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ब्रह्मदेवाला माहित नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही. त्यांना डायनॉसॉर्सच्या अस्तित्वाबद्दलही ज्ञात होते. त्यांनी वेदांमध्ये याविषयी लिहिले असल्याचा दावा देखील खोसला यांनी केला.

खोसला यांनी या गोष्टीचा उल्लेख इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जैविक संयोजनाबाबत सादर केलेल्या शोधनिबंधात केला आहे. पृथ्वीवर जे-जे अस्तित्वात आहे, त्या प्रत्येक गोष्टीविषयी वेदात लिहून ठेवले असल्याचेही खोसला म्हणतात. ‘भारतीय’ डायनॉसॉरचा शोध गुजरातमधील खेडा जिल्ह्यात खोसला आणि त्यांच्या पथकाने लावला होता. ‘राजसॉरस नर्मदा एन्सिस’ असे त्याचे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे.

वेद साधारण 25 ते 30 हजार वर्षांपूर्वी लिहिल्याचे मानले जाते. पण साडेसहा कोटी वर्ष आधीपासून डायनॉसॉरचे अस्तित्व आहे. या गोष्टीकडे भूगर्भशास्त्रज्ञांनी लक्ष वेधले असता, वेद कागदोपत्री लिहिले नसल्याने त्याला वैज्ञानिक आधार नसल्याचे उत्तर खोसलांनी दिले आहे.

Leave a Comment