‘मिस आफ्रिका’चा खिताब जिंकताच घडले असे अघटित

miss
‘मिस आफ्रिका’ या नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये मानाचा विजेतेपदाचा मुकुट चढला डोरकास कासिंडे नामक सौंदर्यवतीच्या शिरी. पण त्यानंतर जे घडले ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडले होते. अशी घटना इतक्या मोठ्या सोहळ्याच्या दरम्यान प्रत्यक्ष मंचावर घडू शकते याचे अनुमान कधीच कोणी लावले नव्हते. नायजेरिया येथे डिसेम्बर महिन्यात ‘मिस आफ्रिका’ या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्यस्पर्धेचे आयोजन केले गेले होते. आफ्रिकेतील निरनिराळ्या राज्यांमधील सौंदर्य स्पर्धा जिंकून आलेल्या सौंदर्यवती या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये ‘मिस काँगो’चा खिताब जिंकलेल्या डोरकास कासिंडेचे नाव विजेती म्हणून घोषित करण्यात आले. आणि त्यानंतर जे घडले, त्याने उपस्थितांच्या तोंडचे पाणी पाळले. विजेतेपदाचा मुकुट डोरकासच्या शिरी ठेवल्या जाण्याच्या काहीच क्षणांपूर्वी अचानक तिच्या केसांना आग लागली.
miss1
डोरकासचे नाव विजेती म्हणून घोषित होताच, तिच्या शेजारी उभ्या असलेल्या स्पर्धक युवतीने तिला शुभेच्छापूर्वक आलिंगन दिले असता, अचानक डोरकासच्या केसांतून ज्वाळा दिसू लागल्या. डोरकासला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. प्रसंगावधान राखून डोरकासच्या केसांमध्ये लागलेली आग विझविली गेली खरी, पण तोवर तिचे पुष्कळसे केस जळून गेले होते. ही घटना नेमकी घडली तरी कशी याचा शोध घेतला गेला असता, सौंदर्यस्पर्धेच्या विजेतीचे नाव घोषित होताच जी आतिषबाजी मंचावर केली गेली, त्यातील एक ठिणगी डोरकासच्या केसांमध्ये शिरल्याने तिच्या केसांना आग लागली असल्याचा खुलासा झाला.
miss2
घडल्या प्रकाराने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, डोरकासने आपण ठीक असल्याचे म्हटले आहे. तसेच तिथे उपस्थित असलेल्या बॅकस्टेज टीमच्या प्रसंगावधानामुळे गंभीर अपघात टाळला गेला असल्याचे समाधान व्यक्त करीत तिने सर्व टीमचे मनापासून आभार मानले आहेत. ‘मिस आफ्रिका’चा खिताब जिंकल्यानंतर डोरकासला पारितोषिक म्हणून ३५ मिलियन डॉलर्स आणि एक आलिशान कार देण्यात आली आहे.

Leave a Comment