शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार!

ajit-pawar
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच सुटत नसताना; या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मला जर पवारसाहेबांनी आणि पक्षाने आदेश दिला; तर माझी शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची तयारी आहे. मी निवडणूक लढविली तर निवडूनच येईल; नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही, असा घणाघात त्यांनी केला.

अजित पवार शिरूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत त्यावेळी भाष्य केले. अजित पवार यावेळी म्हणाले, की एकेक खासदार लोकसभेसाठी महत्त्वाचा असून, शिरूरची जागादेखील त्यादृष्टीने आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आता शिरूरच्या खासदारांचा महिमा संपला आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक सोपी आहे. त्यांच्याविरोधात धाडसाने उभे राहणाऱ्याचा विजय निश्‍चित आहे. जो आमच्यातील निवडणूक लढेल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल.

शिरूर लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन-तीन स्थानिकांना बोललो आहे. पण त्यांनी नको दादा, मला आमदारच व्हायचेय असल्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे माझी आता निवडणूक लढायची तयारी आहे. पवारसाहेबांना मी कालच सांगितले की, तुम्हाला शिरूर लोकसभेसाठी योग्य उमेदवार मिळत नसेल तर आपली निवडणूक लढायची तयारी आहे. पक्ष या मतदारसंघासाठी जी जबाबदारी देईल, ती उचलायची आपली तयारी आहे. येथून मी उमेदवारीचा फॉर्म भरला; तर शंभर टक्के निवडून येईल, त्याशिवाय पवारांची अवलाद सांगणार नाही. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलेच माहिती आहे.

Leave a Comment