‘राहुलनी कुंभमेळ्यात येऊन खोटे बोलण्याचे पाप धुवून घ्यावे’

rahul-gandhi
उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आगामी कुंभमेळ्यात गंगेत डुबकी मारण्यासाठी आमंत्रण दिले आहे. मात्र त्यासाठी त्यांनी अट टाकली आहे. राहुल गांधी हे राफेलच्या मुद्द्यावर गेल्या दोन वर्षांपासून खोटे बोलत आहेत आणि त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कुंभमेळ्यात येऊन आपल्या या पापाचे क्षालन करून घ्यावे, असे सिंह गुरुवारी म्हणाले.

“माता गंगा त्यांच्या सर्व पापांचे क्षालन करेल. त्यासाठी कुंभमेळ्याच्या वेळी गंगा नदीत पवित्र डुबकी घेण्यासाठी प्रयागराजला येण्यासाठी मी त्यांना आमंत्रण देतो. ते गेल्या दोन वर्षांपासून राफेलच्या मुद्द्यावर बोलत असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

लोकसभेत गुरुवारी राफेल जेट व्यवहारावर गरमागरम चर्चा झाली. राहुल गांधी यांच्या आरोपांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तरे दिली. त्या पार्श्वभूमीवर सिंग बोलत होते.

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाबाबत एका प्रश्नाचे उत्तर देताना सिंह म्हणाले, की मंदिर लवकरात लवकर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्वोच्च न्यायालय लवकरच या प्रकरणाचा निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment