जेव्हा सिंहीणीतील मातृत्व जागे होते…बिबट्याच्या पिल्लाला पाजले दूध

leopard
अभयारण्यातील एका सिंहीणीचे मातृत्व जागे होऊन तिने बिबट्याच्या  अनाथ पिल्ला दूध पाजण्याची जगावेगळी घटना गुजरातमध्ये समोर आली आहे. गीर पश्चिम मंडळाचे उप वन संरक्षक धीरज मित्तल यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा तसेच त्याचे चित्रण केल्याचे म्हटले आहे.

गीर पश्चिम मंडळातील अभयारण्यात एक सिंहीण आपल्या दोन पिलांसहित बिबट्याच्या पिल्लाला दूध पाजत असताना आणि जंगलातील इतर सिंहापासून त्याचे रक्षण करताना दिसून आली, असे मित्तल यांनी युनायटेड न्यूज ऑफ इंडिया वृत्तसंस्थेला सांगितले. तसेच त्यांनी या घटनेची काही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. बिबट्याचे हे पिल्लू सुमारे दीड महिन्यांचे आहे.

वन कर्मचाऱ्यांनी सिंहीण आणि बिबट्याच्या या पिल्लातील ही ममता सहा दिवसांपूर्वी पहिल्यांदा पाहिली. “ही खरोखर एक अनोखी घटना आहे, कारण सिंह आणि बिबट्यांचे वैर असल्याचे समजले जाते. सिंहाबाबत आपल्या समजुतीच्या हे अत्यंत विपरीत आहे. ही सिंहीण बिबट्याच्या पिलाची अत्यंत काळजी घेताना दिसते,” असे मित्तल म्हणाले.

मित्तल यांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये बिबट्याचे हे पिल्लू सिंहीण व तिच्या पिलांसोबत राहताना दिसते. काही छायाचित्रांत ते सिंहीणीचे दूध पितानाही दिसते. या पिल्लाच्या आईने त्याला सोडून दिले असावे किंवा एखाद्या घटनेत तेविलग झाले असावेत. कदाचित ती जवळच असावी परंतु सिंहाजवळ जाण्यास घाबरत असावी, असे मित्तल म्हणाले.

वन कर्मचारी या सिंहीण आणि पिल्लावर नजर ठेवून आहेत. त्यांना वेगळे करण्याची आमची योजना नाही, असे मुख्य वन संरक्षक डी टी वासावाडा यांनी सांगितले.

Leave a Comment