भिकाऱ्याच्या कृत्रिम पायात सापडले 96 हजार रुपये!

beggar
मूळ हैद्राबादचा असलेल्या आणि बंगळुरूत नुकतेच मरण पावलेल्या एका भिकाऱ्याच्या कृत्रिम पायात चक्क 96 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आढळली आहे.

हैद्राबादचा रहिवासी असलेला शरीफ हा भिकारी गेले काही दिवस बंगळुरूतील कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकाजवळ भीक मागत होता. तो 75 वर्षांचा होता. अलीकडेच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी त्याच्या मृतदेहाजवळ एक कृत्रिम पायही सापडला. पोलिसांनी या पायाचे निरीक्षण केले तेव्हा त्यात 96,780 रुपये आढळून आले. यात 500 रुपयांच्या 42 नोटा, 100 रुपयांच्या 470 नोटा, 200 रुपयांच्या 20 नोटा, 50 रुपयांच्या 215 नोटा, 20 रुपयांच्या 430 नोटा, 10 रुपयांच्या 528 आणि काही चिल्लर यांचा समावेश होता.

शरीफ हा 15 वर्षांपूर्वी हैद्राबादहून बंगळुरूत आला होता. काही वर्षांनी मधुमेहातून गँगरीन झाल्यामुळे त्याचा पाय कापावा लागला होता. त्यामुळे त्याला कृत्रिम पाय लावण्यात आला होता.

त्याच्या खिशात पोलिसांना हैद्राबादमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांचे पत्ते आणि फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यावरून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला, अशी माहिती पोलिसांनी ‘साक्षी’ वृत्तपत्राला गुरुवारी दिली.

Leave a Comment