मराठा आरक्षणाविरोधात इम्तियाज जलील यांची उच्च न्यायालयात याचिका

imtiyaz-jaleel
मुंबई : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करा, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यासोबतच त्यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करण्याचीही मागणीही केली आहे.

मराठा समाजाच्या राज्य सरकारने दिलेल्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती द्या. याबाबतच्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालाला आव्हान देत मराठा आरक्षण रद्द करा अशी विनंती करणारी याचिका इम्तियाज जलील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्यातील मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना तो डावलला जात असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप असल्यामुळे मुस्लिम समाजाचे आणि यांतील काही ठराविक घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण मंजूर करावे, असेही या याचिकेत म्हटले आहे.

ही याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत सादर करण्यात आली आहे. या याचिकेवरही मुख्य याचिकेसोबत 23 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील हे एमआयएम पक्षाचे नेते असून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

Leave a Comment