राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका करणा-या तरुणाला काढायला लावल्या उठाबशा

raj-thakre1
पुणे – पुण्यातील मनसैनिकांनी सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका करणाऱ्या एका तरुणाला 50 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तसेच सोशल मीडियावर त्याला माफी देखील मागायला लावण्यात आली असून सोशल मीडियावर यापुढे राज ठाकरेंविरोधात कोणी आक्षेपार्ह शब्दात टीका केली तर त्याला अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे.

सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या पेजवर पुण्यातील एका तरुणाने आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. त्या तरुणाचा मनसैनिकांनी शोध घेतला असता पुण्यात तो राहत असल्याचे उघड झाले. पुण्यातील त्या तरुणाच्या घरी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह मनविसेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी पोहोचली. त्या तरुणाला मनसैनिकांनी जाहीर माफी मागायला लावली तसेच त्याला 50 उठाबशा काढायला लावल्या. राज ठाकरेंवर यापुढे आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनसैनिक चिडले होते, पण त्या तरुणाच्या घरी गेल्यावर त्याची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. त्याचे घर भाड्याचे आहे, तर वडिलांचे निधन झाले असल्यामुळे त्याला मारहाण न करता उठाबशा काढायला लावल्या, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment