सिडनी कसोटी : ऋषभ पंतने रचला नवा विक्रम, धोनीलाही टाकले मागे

rishabh-pant
सिडनी : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने चमकदार कामगिरी केली आहे. ऋषभ पंत याने शतक झळकावत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा ऋषभ हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. ऋषभ पंत याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा १२ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.

भारताने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद ६२२ धावांवर पहिला डाव घोषित केला. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत या दोघांनीही दीडशतके झळकावली. ऋषभ पंतने १८९ चेंडूत नाबाद १५९ धावा केल्या. १३७ चेंडूत त्याने आपले शतक पूर्ण केले. ९६ धावांवर असताना चौकार ठोकून पंतने नव्या विक्रमावर नाव कोरले. ऋषभचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले शतक आहे.

सिडनी कसोटीत १५९ धावा करणारा ऋषभ पंत भारताबाहेर सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी धोनीने २००६ साली फैसलाबाद कसोटीत पाकिस्तानच्या विरुद्ध १४८ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा ऋषभ पंत हा दुसरा सर्वाधिक तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. तो २१ वर्षांचा आहे. यापूर्वी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने १८ व्या वर्षी दोन शतके ठोकली होती.

Leave a Comment