हे संघ खेळणार 2020चा ‘टी-20 वर्ल्ड कप’

ICC
दुबई : मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा केली. हे संघ 31 डिसेंबर 2018च्या आयसीसी टी-20 क्रमवारीनुसार ठरवण्यात आले आहेत. यजमान ऑस्ट्रेलिया आणि अन्य नऊ संघ पात्रतेच्या निकषानुसार वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. त्यातील अव्वल आठ संघ थेट सुपर 12 मध्ये खेळतील, तर उर्वरित दोन संघ अन्य सहा संघांसह साखळी फेरीत खेळतील. हे अन्य सहा संघ पात्रता फेरीतील असतील.

आयसीसीच्या ट्वेंटी-20 क्रमवारीनुसार पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांनी सुपर 12 संघांत थेट प्रवेश मिळवला आहे. माजी विजेते आणि तीन वेळचे उपविजेते श्रीलंका व बांगलादेश यांना साखळी फेरीत खेळावे लागणार आहे. ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत रंगणार आहे. संघाला सुपर 12 मध्ये प्रवेश न मिळाल्याने श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाराजी व्यक्त केली आहे, परंतु त्याने साखळी फेरीत दमदार कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन यानेही सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment