थंडीच्या मोसमामध्ये निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाच्या सल्ल्याचा करा स्वीकार

ayurved
थंडीचा मोसम सुरु झाला आहे. आता तापमानामध्ये सातत्याने उतार पहावयास मिळत आहे. थंडीच्या वाढत्या कमानीसोबतच तब्येतीच्या लहान मोठ्या तक्रारी देखील वाढताना पाहावयास मिळत आहेत. या तक्रारींवर उपाय आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब केल्याने बदलत्या हवामानामध्ये आजार-व्याधी दूर राहतीलच, शिवाय एकंदर आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती देखील उत्तम राहण्यास मदत होईल. आयुर्वेदातील वैद्यकीय विज्ञान अतिप्राचीन असून, हे विज्ञान आता देशभरातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध होऊन त्याचा अवलंब केला जात आहे.
ayurved1
आपले शरीर हे तीन दोषांवर आधारित आहे. कफ, वात, पित्त हे ते तीन दोष आहेत. थंडीच्या मोसमामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिक रित्याच सर्वात चांगली असते. तसेच या दिवसांमध्ये पचनशक्ती देखील चांगली असते. त्यामुळे याच गोष्टींना पूरक अश्या काही गोष्टींचा अवलंब केल्याने थंडीच्या मोसमामध्ये आरोग्य चांगले राखणे शक्य होऊ शकते.
ayurved3
थंडीचा मोसम हा वातदोषाशी निगडित आहे. त्यामुळे हा दोष शरीरामध्ये नियंत्रित राहील असा आहार थंडीमध्ये घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने थंडीच्या मोसमामध्ये आहारामध्ये भरपूर ताजी फळे समाविष्ट करावीत. तसेच भरपूर ताज्या भाज्या शिजवून खाल्ल्या जाव्यात. थंडीच्या दिवसांमध्ये अन्न ताजे आणि गरम खाल्ले जावे. तसेच अन्नामध्ये मसाल्यांचा वापर केलेला असावा. थंडीच्या दिवसांमध्ये थंड पेये टाळून उष्ण पेयांचे सेवन अधिक असावे. पाणी पिताना देखील ते कोमट करून प्यावे.
ayurved2
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी स्नानापूर्वी अंगाला कोमट तेलाने मालिश करावी. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतेच, त्याशिवाय थंडीमुळे कोरड्या पडणाऱ्या त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते. थंडीच्या दिवसांमध्ये दुपारचे भोजन हे सर्वात महत्वाचे आणि मोठे भोजन असावे. दुपारच्या वेळी जठराग्नी अधिक प्रदीप्त असल्याने हे भोजन महत्वाचे ठरते. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये सूर्यास्त लवकर होत असल्याने संध्याकाळचे भोजन लवकर आणि पचण्यास हलके असावे. तसेच झोपण्याची वेळही लवकरची असावी. झोपण्याच्या किंवा भोजनाचा वेळा शक्यतो नियमित ठेवाव्यात. त्यामुळे शरीरातील वात दोष नियंत्रित राहतो.
ayurved4
थंडीच्या दिवसांमध्ये वाहणाऱ्या थंड वाऱ्याने शरीरातील वातामध्ये वृद्धी होत असते. त्यामुळे या दिवसांमध्ये उबदार कपडे घालावेत. तसेच बाहेर पडण्यापूर्वी डोके आणि कान झाकेलेले असतील याची काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांमध्ये केला गेलेला व्यायाम शरीरासाठी फायद्याचा आहे. व्यायाम कोणत्याही प्रकारचा असला तरी तो शरीराला फायदा करणारा ठरतो. अश्या प्रकारे आयुर्वेदाप्रमाणे अवलंबलेले आहार, व्यायाम आणि निद्रा यांमधील ताळमेळ थंडीच्या दिवसंमधेही उत्तम आरोग्याचे रहस्य ठरेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही