दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २७७

team-india
पर्थ – ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद २७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ही मजल सलामीवीर हॅरिस, फिंच आणि मधल्या फळीतील हेड या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मारली. ४५ धावांची खेळी शॉन मार्शनेही केली. ४ वेगवान गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या भारताला दिवसभरात सहा बळी टिपता आले. पण त्यापैकी २ गडी फिरकीपटू हनुमा विहारीने बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अतिशय सावध पवित्रा घेत ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि हॅरिस यांनी डावाला सुरुवात केली. १५ व्या षटकात अर्धशतक गाठलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी त्यानंतर तर अधिक संथ खेळ केल्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६ षटकात बिनबाद ६६ धावा एवढी झाली. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर पहिल्या सत्रात ठेवलेली फलंदाजीची संथ लय कायम ठेवत चहापानापर्यंत ३ बाद १४५ अशी मजल मारली.

पहिल्या सत्रात एकही बळी न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात ३ बळी गमावले. बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी १-१ बळी घेतले. शेवटच्या सत्रात मधल्या फळीतील फलंदाज पीटर हॅंड्सकॉम्ब ७ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. विराट कोहलीने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपत त्याला माघारी धाडले. त्याचा काटा इशांतने काढला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला ४५ धावांवर झेलबाद व्हावे लागले. विहारीने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. मार्शने ९८ चेंडूत ही खेळी केली. त्यानंतर संयमी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अर्धशतक ठोकून बाद झाला. अर्धशतक झाल्यानंतर मोठा फटका मारताना तो ५८ धावांवर बाद झाला.

Leave a Comment