टाटाने लॉन्च केली हॅरीअर एसयूव्ही

tata
मुंबई : एसयूव्ही गाड्यांना सध्या भारतीय चारचाकी गाड्यांच्या बाजारामध्ये चांगली पसंती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच टाटानी दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये त्यांची एसयूव्ही श्रेणीतील नवी हॅरीअर ही गाडी लॉन्च केली. सगळ्यांनाच टाटा मोटर्सची नवी एसयूव्ही टाटा हॅरीअरची उत्सुकता लागून राहिली होती. दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये टाटा हॅरीअरची झलक पहायला मिळाली आणि हॅरीअर आता बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

हॅरीअरची स्पर्धा ह्युंदाईची क्रेटा आणि महिंद्राची एक्सयूव्ही ५०० शी असणार आहे. या गाडीचे एक्सटीरीअर अतिशय बोल्ड करण्यात आले आहे. गाडीचे व्हिल्स सुध्दा आकर्षक करण्यात आले आहेत. ही गाडी जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा ती मनाचा ठाव घेणार हे निश्चित मानले जात आहे. या कारमध्ये HDI प्रोजेक्टर हेडलॅम्पस,तर टेललाईटमध्ये hd led लाईटस वापरण्यात आले आहेत. डोर हॅण्डल्सना क्रोम फिनिशींग देण्यात आले आहे. ५ स्पोक अलॉय व्हिल्समुळे हॅरीअर एकदमच भारदस्त दिसते तर इंटिरीअरमध्ये ओक ब्राऊन रंगाचा वापर करण्यात आला आहे. डॅश बोर्डला ओक वूड फिनिशींग देण्यात आले आहे. गाडीत लेग रूम आणि हेडरूमचा विशेष विचार केलेला दिसतो. स्टेअरिंग व्हिलला लेदर फिनिशींग देण्यात आले आहे.

हॅरीअरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष काळजी घेतलेली दिसते. ६ एअरबॅग्स बरोबरच एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ऑफ रोड एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टैबिलिटी कंट्रोल यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर फॉग लॅम्प, रिवर्स पार्किंग कॅमेरा आणि साधारण सर्वच गाड्यांमध्ये उपलब्ध असणारी ड्राइवर आणि को-ड्राइवर सीट बेल्ट रीमाइंडर दिला आहे. गाडी चालवताना ड्राइविंगचा आनंद वाढावा यासाठी तीन विविध मोड देण्यात आले आहेत.

सिटी, इको आणि स्पोर्टी मोड यात देण्यात आले आहेत. १९५६सीसी एवढी क्षमता असलेले इंजिन, ३५० एनएम टॉर्क, ५० लिटर क्षमतेची इंधन टाकी, ६ स्पिड गिअर्स,पुढच्या व्हिलला डिस्क ब्रेक, तर मागे ड्रम ब्रेक, आणि ड्राइविंग करताना संगीताचा आनंद घेता यावा यासाठी ९ जेबीएल स्पिकर्स देण्यात आले आहेत. एकूणच अत्याधुनिक सुविधांसह टाटा हॅरिअर आता प्रत्यक्ष रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

Leave a Comment