टक्केवारीची भाषा केली तर घरी पाठवू, मग सत्ता गेली तरी चालेल

devendra-fadanvis
धुळे – गुंडांचे राज्य शहरात चालणार नाही, त्याचबरोबर कायद्याचा बडगा गुंडांना दाखवला जाईल. तसेच टक्केवारीची भाषा महापालिकेत करणाऱ्यांना घरी पाठवले जाईल, असा दम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडगिरीच्या विषयावरून आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यांनी याद्वारे आमदार अनिल गोटे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात आले होते. ते यावेळी झालेल्या सभेप्रसंगी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळे महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील पांझरा नदी किनारी सभा पार पडली. धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

धुळे शहराचा विकास गेल्या अनेक वर्षात झाला नाही. टक्केवारी राष्ट्रवादी काँग्रेसने खाल्ल्यामुळे आलेल्या निधीचा दुरूपयोग झाला. भाजपच्या हातात धुळे महापालिकेला द्या, धुळे शहराचा कायापालट केल्याशिवाय भाजप राहणार नाही, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. तसेच टक्केवारीची भाषा काही उमेदवार करत आहेत. टक्केवारीची भाषा करणाऱ्या लोकांना घरी पाठवून दिले जाईल, मग सत्ता गेली तरी चालेल. गुंडाराज करणाऱ्यांना कायद्याच्या दंडाने ठोकून सरळ करेन, असे म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे आमदार अनिल गोटेंना लक्ष्य केले.

Leave a Comment