थंडीमुळे कोरड्या पडणाऱ्या त्वचेची अशी घ्या काळजी

winter
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, पांढरी, शुष्क दिसू लागणे, कोरडेपणामुळे त्वचेला खाज सुटणे अश्या तक्रारी आपण नेहमीच अनुभवतो. थंडीच्या दिवसांमधील कोरड्या हवेमुळे त्वचेतील आर्द्रता नाहीशी होऊन त्वचा कोरडी पडू लागते. या समस्येवर जर वेळीच उपाययोजना केली गेली नाही, तर ही समस्या बळावून पुढे त्वचेच्या मोठ्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी अनेक तऱ्हेच्या प्रसाधनांच्या सोबत काही घरगुती उपाय देखील अवलंबता येऊ शकतील.
winter1
अॅव्होकाडो या फळामध्ये त्वचेला स्निग्धता देणारे फॅटस् मोठ्या प्रमाणावर असतात. या तत्वांमुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा मुलायम बनण्यास मदत होते. अर्धा अॅव्होकाडो कुस्करून त्यामध्ये एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल आणि अर्धा कप साखर घालावी. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे आणि हाता-पायांना चोळून लावावे. या स्क्रब मध्ये असलेल्या अॅव्होकाडो आणि ऑलिव्ह ऑइल मुळे त्वचा मुलायम होते, तर साखरेच्या कणांमुळे त्वचेवरील मृत पेशींचा थर दूर होतो. हा स्क्रब त्वचेवर काही मिनिटे चोळल्यानंतर स्नान करावे आणि त्यानंतर इ जीवनसत्व युक्त मॉईश्चरायझर त्वचेवर लावावे.
winter2
दह्यामध्ये असलेल्या लॅक्टीक अॅसिडमुळे त्वचेवरील मृत पेशी हटण्यास मदत मिळते, व त्वचेला आर्द्रता ही मिळते. दही आणि मधाचे मिश्रण त्वचेवर चोळून लावल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत मिळते. हे मिश्रण त्वचेवर लावून दहा मिनिटे ठेवावे आणि त्यानंतर स्नान करावे. तसेच अॅलो व्हेरा ही त्वचेला आर्द्रता देण्याचे काम करते. अॅलो व्हेराचे पान कापून घेऊन त्यामधील गर काढून घ्यावा, आणि त्यामध्ये इ जीवनसत्व असलेल्या तेलाचे काही थेंब टाकावेत. या साठी इ जीवनसत्वाची कॅप्सूलही वापरता येईल. या कॅप्सूलमधील जेल अॅलो व्हेराच्या गरामध्ये घालून घेऊन हे मिश्रण त्वचेवर लावावे. हे मिश्रण काही मिनिटे त्वचेवर राहू देऊन त्यानंतर स्नान करावे. स्नान झाल्यानंतर त्वचेवर पेट्रोलियम जेलीने हलका मसाज करावा.
winter3
पिकलेल्या केळ्यामध्येही त्वचेला आर्द्रता देण्याचे गुण आहेत. याचा उपयोग करण्यासाठी अर्धे पिकलेले केळे कुस्करून घ्यावे. त्यामध्ये एक मोठा चमचा मध आणि एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे. हे मिश्रण त्वचेवर हलक्या हातांनी गोलाकार मालिश करीत लावावे, आणि पाच ते सात मिनिटे त्वचेवर राहू द्यावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे स्नान करावे. त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. तसेच या दिवसांमध्ये स्नानासाठी अतिशय गरम पाण्याचा उपयोग करू नये. अतिशय गरम पाण्याच्या वापराने देखील त्वचा कोरडी पडू लागते. त्वचा खूपच कोरडी असेल, तर मॉईश्चरायझरचा वापर दिवसातून अनेकदा करावा. या दिवसांमध्ये साबणाचा अतिवापर टाळावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही