उत्तम आरोग्यासाठी या फळांचे अवश्य करा सेवन

fruite
शीत ऋतूचे आगमन होत आहे. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अभावानेच मिळणाऱ्या ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि विविध फळेही बाजारामध्ये दिसू लागली आहेत. ताज्या भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे आपण जाणतोच. पण खास थंडीच्या दिवसांमध्ये मिळणारी फळे देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी आहेत. संत्री, पेरू, द्राक्षे, चिकू, अंजीरे यांसारखी फळे थंडीच्या दिवसांमध्ये विशेष लाभकारी आहेत.
fruite1
संत्रे हे फळ क जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे. या जीवनसत्वामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढतेच, पण त्याशिवाय शरीराला पोषण देणारी पोटॅशियम, इतर क्षार, फोलेट आणि फायबरही या फळामध्ये मुबलक मात्रेमध्ये आहेत. संत्र्याच्या रसामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असून यामध्ये फॅटस् नाहीत. त्यामुळे वजन कमी करण्याच्या दृष्टीने देखील या फळाचे सेवन हा चांगला पर्याय आहे. संत्र्याचा रस पिण्याऐवजी संपूर्ण संत्रे खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे फायबर मिळते.
fruite3
पेरू या फळामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक मात्रेमध्ये आहेत. ही दोन्ही तत्वे पचण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे पेरू खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे दोन जेवणांच्या मधल्या वेळी जाणविणाऱ्या भुकेसाठी पेरूसारख्या फळाचे सेवन हा चांगला पर्याय आहे. पूर्ण न पिकेलेल्या पेरुंमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. या फळाच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेले फायबर मिळते आणि त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
fruite2
द्राक्षे, विशेषतः लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये आढळून येणारे ‘एलीगेईक अॅसिड’ शरीरामध्ये चरबी साठण्याचे प्रमाण कमी करण्यास सहायक असल्याचे निदान ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये करण्यात आले आहे. तसेच काळ्या द्राक्षांमध्ये आढळणारी तत्वे शरीरासाठी अतिशय लाभकारी असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. थंडीच्या दिवसांमध्ये चमचमीत, मसालेदार, तळलेल्या पदार्थांचे सेवन जास्त केल्याने वजन वाढू लागल्यास ही द्राक्षे वजन नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरू शकतात. चिकू आणि अंजीर या फळांमध्ये ही डायटरी फायबर मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी या फळांचे सेवन उत्तम आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment