इस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले आठ देशांचे ३१ उपग्रह

Isro
श्रीहरीकोटा – आणखी एक मोठी झेप अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने घेतली आहे. गुरुवारी सकाळी पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाद्वारे इस्त्रोने एकाचवेळी ३१ उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हायसिस हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. अन्य उपग्रहांमध्ये आठ देशांचे ३० छोटे उपग्रह असून अमेरिकेचे सर्वाधिक २३ उपग्रह आहेत.

पीएसएलव्ही सी ४३ ने सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अवकाशाच्या दिशेने झेप घेतली. पीएसएलव्हीचे हे ४५ वे उड्डाण आहे. हे उपग्रह अवकाशातील दोन वेगवेगळया कक्षांमध्ये सोडण्यात येतील. ११२ मिनिटांची ही संपूर्ण प्रक्रिया असेल. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे. मागच्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्त्रोने सर्वाधिक १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

भारतात कारखान्यांमधून मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. आता या प्रदूषणावर हायसिसच्या मदतीने लक्ष ठेवता येईल असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. पृथ्वीच्या पुष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पति आणि अन्य माहिती मिळवता येणार आहे. काय हवे आहे ती माहिती शास्त्रज्ञ घेऊ शकतात. या उपग्रहाची सर्वाधिक मदत प्रदूषणाची माहिती देण्यामध्ये होईल. ३८० किलो वजनाच्या हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असेल.

Leave a Comment