शिवछत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

shripad-chindam
अहमदनगर – उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा व महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याला निवडणूक काळात शहरातून हद्दपार करण्याचा आदेश दिला. अशाच स्वरुपाची कारवाई छिंदम याच्यासह आणखी पाच जणांवर करण्यात आली आहे.

शहरात निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कोतवाली, तोफखाना व भिंगार कँप पोलिसांनी आजी, माजी आमदार, विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवकांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्याची सुनावणी टप्प्या टप्प्याने होऊन आदेश पारित केले जात आहेत.

निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत छिंदम याच्यासह ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे, दिपक खैरे या पाच जणांना शहरातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई १५ दिवसांसाठी करण्यात आली आहे. महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वीच्या निवडणूक काळातही छिंदम याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.

अटी व शर्तीवर शहरातील वास्तव्यास परवानगी भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड, राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे, संजीव भोर आदी १४ जणांना देण्यात आली आहे. ५० हजार रुपयांचा जातमुचलका, चांगल्या वर्तणुकीची हमी व पोलिस ठाण्यात रोज हजेरी अशी बंधने त्यांच्यावर टाकण्यात आली आहेत.

Leave a Comment