शरद पवार यांना उदयनराजेंकडून कमळाचा बुके!

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण शरद पवारांना कमळांचा बुके दिला असल्याचे सूचक विधान केले आहे. उदयनराजेंनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली. पत्रकारांशी यावेळी संवाद साधताना उदयनराजेंनी विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. घड्याळावर की कमळावर लोकसभा निवडणूक लढवणार? असा प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी हे सूचक विधान केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे नुसत्या सवलती नको असेही उदयनराजेंनी म्हटले आहे.

सध्या सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. पण त्यांना २०१९ साली पुन्हा तिकीट द्यायला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत विरोध केला होता. रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार साताऱ्यातून द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली होती.

तर दुसरीकडे आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे उदयनराजेंनी सांगितले होते. पण जो निर्णय पवारसाहेब घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे म्हणाले होते. परंतू, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी या बैठकीनंतर दिला होता.

Leave a Comment