अयोध्येत जय श्रीराम बनली मोबाईलची कॉलर ट्यून

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचा संदेश प्रभावी पद्धतीने जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ‘जय श्रीराम’ ही मोबाईलची कॉलर ट्यून ठेवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत 10 हजारांपेक्षा अधिक लोकांनी ही ट्यून डाऊनलोड केली असून इतरांनाही डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे.

‘जय जय श्रीराम’ अशी ही कॉलर ट्यून असून जनतेने ती डाऊनलोड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिजीत मिश्र यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

“रामापेक्षा रामाचे नाव मोठे आहे. जय श्रीराम ही धून कॉलर ट्यूनद्वारे ऐकणाऱ्यांचा भक्तिभाव नक्कीच जागृत होईल, अशी मला खात्री आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होईल, ” असे मिश्र म्हणाले.

भगवान राम हे समरसतेचे प्रतीक असून श्रीरामांनी जातीची बंधने मोडली आणि प्रत्येक वर्गाच्या लोकांना आपल्याशी जोडले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बाबर समर्थकांवर टीका करताना मिश्र म्हणाले, की बाबर हा आक्रमक होता आणि त्याचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकांमध्ये स्पष्टपणे आहे.कोणी बाबराची तुलना भगवान रामाशी करत असेल तर ती निश्चितच मानसिक गुलामी आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment