सनथ जयसूर्यावर सडलेल्या सुपाऱ्यांची तस्करीचा आरोप

sanath-jaysuriya
नागपूर : श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या आणि अन्य दोन क्रिकेटपटू अवैधरितीने भारतात सडलेल्या सुपाऱ्यांची तस्करी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर चुकवल्याचा ठपकाही यातिघांवर ठेवण्यात आला आहे.

नागपूर येथे कोट्यवधी रुपयांच्या सुपाऱ्यांची तस्करी डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलीजंट्सने पकडली. जयसूर्याचे नाव या प्रकरणी तपास केल्या असता समोर आले आहे. त्याला पुढील तपासासाठी मुंबईत रेव्हेन्यू इंटेलीजंट्स पथकासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी श्रीलंका सरकारला पत्रही पाठवण्यात आले आहे. अन्य दोन क्रिकेटपटूंची नावे जाहीर करण्यात आली नाही, पण २ डिसेंबरला त्यांनाही तपासासाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते.

याबाबत एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार उप संचालक दिलीप शिवरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, इंडोनेशियातून कोट्यवधी रुपयांच्या सुपाऱ्या श्रीलंकामार्गे भारतात आणल्या जात होत्या. बनावट कंपन्यांची कागदपत्र त्यासाठी दाखवण्यात आली होती. या सुपाऱ्या कर चुकवण्यासाठी श्रीलंकेतून भारतात आणल्याचे दाखवण्यात आले होते.

जयसूर्याने या बनावट कंपन्यांच्या स्थापनेसाठी त्याच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. इंडोनेशियातून या सुपाऱ्या आयात केल्यास त्यावर १०८ टक्के कर लागतो, परंतु श्रीलंकेमार्गे सुपाऱ्या भारतात आणून तो कर चुकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Comment