मुंढेंची बदली झाल्याचा फटाके फोडून भाजपचा आनंदोत्सव

tukaram-mundhe
नाशिक – अवघ्या नऊ महिन्यांमध्ये नाशिकच्या आयुक्त पदावरुन कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली. दरम्यान, मुंढेंच्या बदलीला नाशिकमधूनच विरोध होत आहे. आज मुंढेंच्या बदलीला विरोध करत अनेक नागरीकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मुंढेंच्या समर्थनासाठी जमलेल्या नागरीकांनी आज सकाळी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वाराचा परिसर ‘वुई वॉन्ट मुंढे’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. मुंढेंची बदली काल सुट्टी असतानाही कशी करण्यात आली असा सवाल नागरीकांनी विचारला. तर भाजपचे सरकार मुजोर सरकार आहे अशा शब्दांमध्ये नागरीकांनी भाजपविरोधात रोष व्यक्त केला.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही यामध्ये समावेश होता. मुंढेंच्या बदलीला विरोध करणाऱ्या आपच्या काही कार्यकर्त्यांना आणि नागरीकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. तर, दुसरीकडे मुंढेंची बदली झाल्याचे समजताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगला येथे आज सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

आयुक्त मुंढे हे आंदोलन सुरू असतानाच नेहमीप्रमाणे पालिकेत हजर झाले. ते आंदोलकांच्या गर्दीतून वाट काढत आपल्या दालनात गेले. त्यानंतर उपस्थित पत्रकारही त्यांच्यामागे दालनात गेले. अद्याप बदलीसंदर्भातील कुठलेही पत्र माझ्याकडे आलेले नाही, त्यामुळे मी नियमीत कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. पण मुंढेंना अखेर बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न आणि चर्चा होत होत्या. फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच आयुक्‍त मुंढे हे वादात आणि चर्चेत राहिले आहेत.

Leave a Comment