अमेरिकेला पछाडत भारत स्मार्टफोन खरेदीमध्ये दुसऱ्या स्थानी

smart
भारताने स्मार्टफोनची जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. भारताने जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनालिस या संस्थेने दिला आहे. भारतीय बाजारपेठेत या तिमाहीमध्ये दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४.०४ कोटी एवढी होती. तर चीन पहिल्या स्थानावर १०.०६ कोटींच्या स्मार्टफोनसह आहे.

अमेरिकी बाजारपेठेत याच कालावधीत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४ कोटी होती, त्यामुळे या कालावधीत झालेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पण चिनी बाजारपेठ स्मार्टफोन्सच्या खरेदीच्या बाबतीत भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जागतिक बाजारपेठांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मंदी आहे व जागतिक बाजारात स्मार्टफोन्सची एकूण उलाढाल घटली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये स्मार्टफोन्सची विक्री ७.२ टक्क्यांनी घटून ३४.८९ कोटी एवढी झाली आहे. स्मार्टफोन्सच्या विक्रीत गेले चार महिने सातत्याने घट होत असल्याचे कॅनालिसने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

स्मार्टफोन्सच्या विक्रीत जगातील दहापैकी सात देशांमधील बाजारपेठांमध्ये घट झाली आहे व २०१५ नंतरची आत्तापर्यंतची ही सर्वात सुमार कामगिरी आहे. स्मार्टफोन बदलण्याचा कालावधी वाढल्यामुळे हे होत असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदवले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असलेल्या समस्या व बड्या चिनी उत्पादकांचे आव्हान यामुळेही बाजारावर परिणाम झाल्याचे कॅनालिसने म्हटले आहे.

Leave a Comment