भारतीय सैन्य दलात दाखल झाल्या ३८ किलोमीटर पर्यंतच्या शत्रुलाही भेदणाऱ्या तोफा

nirmala-sitaraman
नाशिक : आज संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते तोफखाना दलाच्या देवळाली कॅम्प येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात के-९ वज्र, हलक्या वजनाची एम ७७७ या तोफा आणि युद्धभूमीवर कोणत्याही तोफेला खेचून नेण्याची क्षमता असणारे वाहन तोफखाना दलात समाविष्ट करण्यात आल्या.

वेगवेगळ्या अंतरांवर मारा करणाऱ्या तोफा भारतीय तोफखाना दलाकडे आहेत. जुनाट तोफांचे बॅरल आणि सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती जिकिरीची ठरल्यामुळे एकाच क्षमतेच्या (१५५ एम.एम.) सर्व तोफा ठेवण्याचे आधीच निश्चित झाले.

राजकीय पटलावर स्वीडिश बनावटीच्या बोफोर्स तोफा खरेदीचा विषय एवढा वादग्रस्त ठरला की, पुढील काळात तत्कालीन केंद्र सरकारने नवीन तोफा खरेदी करण्याची हिंमत दाखविली नाही. केंद्रातील विद्यमान सरकारने ही कोंडी फोडली. आधुनिकीकरणाची प्रक्रिया रखडली होती. हे लक्षात घेऊन विद्यमान सरकारने दक्षिण कोरियन बनावटीच्या के-९ वज्र – टी १०० तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० तोफा दक्षिण कोरियातून घेऊन उर्वरित ९० तोफांची देशात निर्मिती करण्यात येणार आहे.

४० किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता १५५ एमएम क्षमतेच्या या तोफेची आहे. हलक्या वजनाच्या तोफा तोफखाना दलाच्या भात्यात समाविष्ट करण्याचा रेंगाळलेला विषय अमेरिकन बनावटीच्या ‘एम ७७७’ हलक्या वजनांच्या तोफांमार्फत मार्गी लागत आहे. तोफखाना दलात पुढील काही वर्षांत या १४५ तोफा दाखल होतील. भारतीय तोफखान्यात सध्या अवजड आणि जुनाट तोफांचा भरणा आहे.

चीनलगतच्या उंच पर्वतीय सीमावर्ती भागात त्यांचा वापर करणे अवघड आहे. अति उंच प्रदेशात वापरता येतील, अशी एम ७७७ ही तोफ आहे. बोफोर्स आणि इतर तोफांचे वजन साधारणत: १३ ते १४ टन आहे. तुलनेत एम ७७७ चे वजन केवळ चार टन आहे. युद्धकाळात इतका भार वाहू शकणाऱ्या हेलिकॉप्टरद्वारे तिला तातडीने रणभूमीवर तैनात करता येईल.

नवीन तोफांच्या जोडीला युद्धभूमीवर तोफांना तातडीने कार्यप्रवण करता यावे म्हणून खास वाहनही समाविष्ट होत आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या गरजा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने दलाची प्रहारक क्षमता वाढणार असल्याची तोफखाना दलातील अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

Leave a Comment