विकले जात आहेत फेसबुक युजरचे खासगी मेसेज!

facebook
डेटा चोरीच्या आरोपांमुळे आधीच वादात अडकलेले फेसबुक आणखी अडचणीत येण्याची शक्यता असून यासंदर्भात बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, युजर्सचा डेटा फेसबुकवरुन चोरी केला जात असून, चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल ८१ हजार युजर्सचे अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. युजर्सच्या मेसेज बॉक्समधील खासगी मेसेज हे सर्व अकाऊंट हॅक करुन विकले जात आहेत. प्रत्येक अकाऊंटमागे ६ रुपये ५० पैशांमध्ये ही माहिती विकली जात आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

१२ कोटी अकाऊंट्सची ‘एफबीसेलर’ (FBSaler) नावाच्या एका युजरने विक्री केल्याची माहिती ‘इंटरनेट फोरम’ला दिली. हा प्रकार सप्टेंबर महिन्यात घडला. या प्रकरणाचा सायबर सेक्युरिटी फर्म डिजिटल शॅडोजने सखोल तपास केला असता तब्बल ८१ हजार युजर्सची खासगी माहिती विकण्यात आल्याचे समोर आले.

माहिती पडताळून पाहण्यासाठी डेटा विकण्यात आलेल्या पाच फेसबुक युजर्सशी बीबीसीने संपर्क साधला. त्यांच्या नावे असणारे मेसेज दाखवले असता हे आपलेच मेसेज असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे यामध्ये फक्त मेसेज नाही तर फोटोंचाही समावेश होता. ज्या युजर्सचा डेटा विकला जात आहे ते प्रामुख्याने यूक्रेन, रशिया, यूके, अमेरिका आणि ब्राझील देशातील आहेत. इतर देशांमध्येही हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

Leave a Comment