अॅपलने लाँच केले पेन्सिल, मॅकबुक एअर आणि नवा आयपॅड प्रो

apple
नव्या मॅकबुक एअर मॉडेलची नवीन आवृत्ती आणि फेस आयडीसह अनेक उत्तम फिचर्स असलेला नवा आयपॅड प्रो अॅपल कंपनीने लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने मॅक मिनी आणि मॅक पेन्सिलही सादर केली. कंपनीने ही उपकरणे न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन अॅकेडमी ऑफ हॉवर्ड गिलमॅनच्या ओपेरा हाउसमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये लाँच केली.

अॅपल मॅकबुक एअरच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. रेटिना डिस्प्ले, टच आयडीच्या माध्यमातून बायोमॅटीक ऑथेंटिकेशन प्रणालीचा यामध्ये समावेश आहे. हा कमी वजनाचा कमी जाडीचा डिस्प्ले असलेला लॅपटॉप आता आणखी हलका झाला आहे. आता टचआयडीचा (फिंगरप्रिंट स्कॅनर) समावेश यामध्ये करण्यात आला आहे. वजन केवळ १.३४ किलो आहे. इंटेलच्या आठव्या पिढीतील प्रोसेसर, १६ जीबीपर्यंत रॅम, १.५ टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय यात आहे. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी १२ तासांचा बॅकअप देईल असा दावा कंपनीने केला आहे. अद्ययावत कि-बोर्ड देण्यात आला असून कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाईप-सी, थंडरबोल्ट पोर्ट आदी पर्याय आहेत. याच्या विविध व्हेरिअंटची किंमत १,१४,९०० रुपयांपासून सुरू होत असून भारतात याची विक्री ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

या कार्यक्रमातच आयपॅड प्रो (२०१८) या नव्या टॅबलेटलाही लाँच करण्यात आले आहे. यंदा यामध्ये होम बटनचा समावेश करण्यात आलेला नाही. यातील सर्वात आकर्षक फिचर म्हणजे फेस आयडी असून अनेक आयफोनमध्ये हे फिचर असले तरी या फिचरचा पहिल्यांदाच समावेश आयपॅडमध्ये करण्यात आला आहे. पुढील बाजूला असलेल्या १२ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे फिचर वापरता येईल. याच्या मागील बाजूला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ६४ जीबी ते १ टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. याच्या विविध व्हेरिअंटची किंमत ७१ हजार ९०० रुपयांपासून पुढे आहे. याशिवाय कंपनीने अॅपल पेन्सिल देखील सादर केली आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. याद्वारे नोट्स घेणे सहजसोप्प होणार आहे. या पेन्सिलची किंमत १० हजार ९०० रुपयांपासून पुढे आहे. याशिवाय मॅक मिनी हा छोट्या आकाराचा मिनी कॉम्प्युटर आता आणखी स्मार्ट झाला आहे. यामध्ये आता 4/6 Core इंटेल प्रोसेसर्सचा समावेश करण्यात आलेला असून याची किंमत ७५ हजार ९०० रुपये एवढी असेल.

Leave a Comment