उदयनराजे विजयादशमीच्या ‘शाही सीमोल्लंघना’द्वारे करणार शक्तिप्रदर्शन

udyanraje-bhosale
सातारा – सध्या राजकीय वर्तुळात खासदार उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. पण साताऱ्यात आता उदयनराजेंच्या सीमोल्लंघनाची चर्चा रंगली आहे. कारण, किल्ले प्रतापगड येथे उदयनराजेंनी आई भवानी मातेची महापूजा केली. राज्यावर पडलेल्या दुष्काळी वातावरणाचे संकट दूर व्हावे, असे साकडेही त्यावेळी घातले. त्यानंतर, शाही सिमोल्लंघनाची तयारी करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.


खासदार उदयनराजे भोसले आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या इशारातून निवडणुकांचे संकेत देत आहेत. माझ्या पाठिशी सातारची जनता खंबीरपणे उभी आहे. आता वेळ आहे सिमोल्लंघनाची, त्याची तयारी करा अशी सूचना उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जलमंदिर पॅलेस येथे सातारा विकास आघाडीची बैठक झाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य या बैठकीस उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी यावेळी शाही सिमोल्लंघानाचा आग्रह धरला. उदयनराजेंनीही त्यावेळी स्मीतहास्य करुन मी असतोच, तुम्हीही या असे म्हणत कार्यकर्त्यांना शाही सिमोल्लंघनाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे शाही सिमोल्लंघनाच्या माध्यमातून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसून येते. तर विजयादशमीचे सिमोल्लंघन हे अनेक राजकीय नेत्यांसाठी शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.

Leave a Comment