कार्यक्षमता वाढविण्यासाठी वापरा ही मोबाईल अॅप्स

app
प्रत्येक कामासाठी आणि आपल्या हर तऱ्हेच्या गरजेसाठी अनेक मोबाईल अॅप्स विकसित करण्यात येत आहेत. मग अगदी हॉटेल्समधून आपल्या आवडीचे पदार्थ मागविणे असो, किंवा आपण दररोज किती पावले चाललो याचा होशोब ठेवणे असो. कपड्यांपासून घरातील वाणसामानापर्यंतची खरेदी असो, किंवा ऑनलाइन बिले भरण्यासाठी असो, आता सर्वच अॅप्स आपल्या हाताशी असल्याने आपले सर्वांचेच आयुष्य खूप सुकर झाले आहे. त्याचबरोबर आपल्या कामाचे नियोजन करण्यास मदत करून आपण अधिक कार्यक्षम होण्यासाठी साहाय्य करणारी अॅप्स देखील आता मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत. अश्याच काही अॅप्स बद्दल जाणून घेऊ या.
app1
‘एव्हरनोट’ नामक अॅप द्वारे आपल्या कामासंबंधी नोट्स बनविणे आणि त्याद्वारे आपल्या विचारांची आणि कामांची मुद्देसूद आखणी करणे शक्य होते. तसेच आपल्या कामासंबंधी छायाचित्रे किंवा इतर वेबसाईटद्वारे लिंक्स कॉपी करून त्या आपल्या नोट्समध्ये समाविष्ट करणे देखील या अॅप द्वारे सहज शक्य होते. ‘ट्रेलो’ नामक अॅप द्वारे आपल्याला करावयाच्या असलेल्या कामांची यादी बनवून, त्यांची योग्य विभागणी ‘kanban boards’ च्या माध्यमातून करता येते. अश्या रीतीने आपल्या कामांमध्ये आपल्याला समाविष्ट करण्याच्या प्रत्येक पायरीचे मार्गदर्शन हे अॅप करीत असते. त्यामुळे काम वेळशीर पूर्ण करता येतेच, शिवाय कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची खबरदारी हे अॅप घेत असते.
app2
आजकाल आपल्या कामासाठी सहायक अशी माहिती पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन उपलब्ध असते. कधी कधी या उपलब्ध माहितीचे प्रमाण इतके जास्त असते, की त्यामुळे गोंधळ उडण्याची देखील शक्यता असते. पण आपल्याला हव्या असणाऱ्या माहितीशी निगडित डेटा, त्यासंबंधीची छायाचित्रे, किंवा इतर इमेजेस, आपल्या कामाशी निगडित माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या महत्वाच्या साईट्स याची एकत्रित माहिती ‘पॉकेट’ नामक अॅप वर सेव्ह करता येते. त्यामुळे आपल्या कामाशी निगडित डेटा शोधताना या अॅप वर सेव्ह केलेली माहिती त्वरित उपलब्ध होते, आणि वेळही वाचतो.

‘जी सूट’ नामक अॅप द्वारे आपण फाईल्स तयार करू शकतो, शेअर करू शकतो आणि कुठल्याही ठिकाणाहून त्या ‘अॅक्सेस’ करु शकतो, म्हणजेच त्या फाईल्सचा उपयोग आपण करू शकतो. या फाईल्स गुगल वरुन या अॅपमध्ये डाऊनलोड करता येतात. ‘टोगल’ नामक अॅप, आपण कोणत्या कामासाठी किती वेळ खर्च करत आहोत यावर लक्ष ठेवणारे अॅप आहे. आपली सर्व कामे आटोपत असताना त्यांमध्ये किती वेळ खर्च झाला आहे याची माहिती आपल्याला मिळत असल्याने महत्वाच्या कामांसाठी वेळेचे नियोजन करणे अधिक सोपे होते, आणि त्याचबरोबर आपली कार्यक्षमता देखील वाढते.

Leave a Comment