रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली असून या सर्व कंपन्यांमध्ये ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर देण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु असल्याचे चित्र आहे. नुकतीच एअरटेलने धमाकेदार ऑफर आणली आहे. एअरटेलने ही ऑफर आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी कमी रुपयांमध्ये जास्त इंटरनेट डेटा देत लाँच केली आहे.
जिओच्या प्लॅनला टक्कर देणार एअरटेलचा ९७ रुपयांचा धमाकेदार कॉम्बो प्लॅन
कंपनीकडून ९७ रुपयांच्या कॉम्बो प्लॅनमध्ये १.५ जीबी इंटरनेट डेटा आणि ३५० मिनिटे कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंग अशा दोन्हींचा समावेश आहे. तर २०० मेसेज मोफत मिळणार आहेत. २८ दिवसांची या प्लॅनची व्हॅलिडीटी आहे. हा ९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देशभरात उपलब्ध आहे. कंपनीच्या आधीच्या ९९ रुपयांच्या प्लॅनला हा प्लॅन पर्याय असेल. २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा आणि १०० मेसेज मोफत यामध्ये मिळत होते. एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच My Airtel अॅपवर या रिचार्जचा फायदा घेता येणार आहे. कंपनीने याआधी आणखी स्वस्तातील ३५, ६५, ९५ रुपयांचे प्लॅन लाँच केले होते. हे प्लॅन्सही जिओला टक्कर देण्यासाठी आणले होते.