भारतातून पेट्रोल आयात करणाऱ्या भूतानमध्ये तब्बल २३ रुपयांनी पेट्रोल स्वस्त

bhutan
पेट्रोल आणि डिझेल यांचे दर मागील तीन आठवड्यांपासून वाढतच चालले आहेत. मुंबईत आज पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी महागले. एकंदरीतच मागील काहीदिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सोशल मिडियावरही याची झलक पहायला मिळत असून सोशल मीडियावर भूतान आणि भारतामधील इंधन दरामध्ये असणाऱ्या फरकासंदर्भातील एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

पाच दिवसांपूर्वी निलुत्पल दास यांनी शेअर केलेली पोस्ट साडेतीन हजारहून अधिक लोकांनी शेअर केली आहे. दास यांनी पेट्रोल पंपाचे दोन फोटो काढून त्याबरोबर शेअर केलेला मजकूर भारतातील इंधनाच्या दरांसंदर्भात खरोखरच विचार करायला लावणारा आहे.

दास यांनी या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शेअर केलेला फोटो हा भूतानमधील पेट्रोल पंपाचा असून ९ सप्टेंबर रोजी ते भूतानला गेले होते. त्यांनी तेव्हा तो फोटो काढला आहे. दास या पोस्टमध्ये म्हणतात, मी आज भूतानमधील सॅमड्रूप जोंगखा येथे गेलो होतो आणि तिथे इंडियन ऑईल कंपनीचे एक लिटर पेट्रोल ६० रुपये ०४ पैशांना मिळत असल्याचे मला दिसले. गुवाहाटीमध्ये ९ सप्टेंबर २०१८ रोजी याच एक लिटर पेट्रोलची किंमत ८२ रुपये ९७ पैसे होती. विशेष म्हणजे भारतामधून भूतानमध्ये पेट्रोल आयात केले जाते. असे असूनही भारतात आपल्याला एक लिटर इंधनासाठी भूतानमधील दरांपेक्षा २२ रुपये ९३ पैसे अधिक मोजावे लागतात.

सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये निलुत्पल यांच्या या पोस्टखाली कमेन्ट सेक्शनमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. भारतामधील दर हे इतर अनेक देशांपेक्षा कमीच असल्याचे काहींनी म्हटले आहे तर सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या कराचा हिस्सा खूपच अधिक असल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment