वैयक्तिक माहितीचा गैरवापर – मोझिलाच्या संस्थापकाची गुगलच्या विरोधात तक्रार

combo
वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याबद्दल ब्रेंडन आईश या तंत्रज्ञाने गुगलच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ब्रेंडन हा मोझिला फायरफॉक्स ब्राऊझरचा सह-संस्थापक असून तो ब्रेव्ह या ब्राऊझरचा संस्थापक आहे.

ब्रेव्ह कंपनीच्या वतीने ब्रिटन व आयर्लंडमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली असून गुगल व अन्य डिजिटल जाहिरात कंपन्यांच्या विरोधात ती मैलाचा दगड सिद्ध होऊ शकते.

युरोपीय महासंघातील युरोपियन जनरल डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) कायद्यात नवे कलम समाविष्ट करावे आणि संपूर्ण युरोपमध्ये तपास करावा, अशी या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. जीडीपीआर कायद्यान्वये वापरकर्त्यांना त्यांच्या खासगी माहितीचे संरक्षण करण्याचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत.

“वापरकर्त्यांच्या ऑनलाईन व्यवहारानुसार जाहिराती करणाऱ्या उद्योगाच्या केंद्रात प्रचंड प्रमाणात आणि व्यवस्थाबद्ध माहितीचा गैरवापर आहे. जीडीपीआर मंजूर होण्यापूर्वी दोन वर्षांचा कालावधी देऊनही या कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही, असे ब्रेव्ह कंपनीचे मुख्य धोरण अधिकारी जॉनी ऱ्यान यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले.

एखादी व्यक्ती एखाद्या संकेतस्थळाला भेट देते तेव्हा त्यांची वैयक्तिक माहिती आणि ते ऑनलाईन काय करतात, याची माहिती शेकडो कंपन्यांना त्यांच्या अपरोक्ष देण्यात येते. त्याद्वारे जाहिराती सादर करण्यात येतात, अशी तक्रार याचिकेत करण्यात आली आहे.

या वर्षी जुलै महिन्यात युरोपियन कमिशनने अँटीट्रस्ट कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुगलला 5 अब्ज डॉलरचा दंड ठोठावला होता.

Leave a Comment