उद्या दिसणार शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण


मुंबई – उद्या म्हणजेच २७ जुलै रोजी २१ व्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून ३ तास ५५ मिनिटे हे चंद्रग्रहण होणार असून १ तास ४३ मिनिटे त्यातील खग्रास स्थिती दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १६ जुलै २००० रोजी गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण झाले होते. त्यावेळी १ तास ४७ मिनिटे खग्रास स्थिती दिसली होती.

संपूर्ण चंद्रबिंब ज्यावेळी पृथ्वीच्या छायेत येते त्याला ‘खग्रास स्थिती‘ असे म्हणतात. अशावेळी पौर्णिमा असूनही चंद्रबिंब जास्त प्रकाशित न दिसता काळसर, लालसर रंगाचे दिसते. पृथ्वीपासून चंद्र त्यादरम्यान सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मी अंतरावर असतो. दीर्घ वर्तुळाकार मार्गाने तो पृथ्वीभोवती भ्रमण करीत असतो. यावेळी चंद्र पृथ्वीपासून ४ लक्ष ६ हजार कि.मी अंतरावर असणार आहे. तसेच पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून चंद्रबिंब जाणार असल्यामुळे पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास चंद्राला जास्त वेळ म्हणजेच ३ तास ५५ मिनिटे एवढा वेळ लागणार आहे.

अंटार्क्टिका, आस्ट्रेलिया, रशियाचा काही भाग, संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथून हे चंद्रग्रहण दिसणार आहे. यापुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे ९ जून २१२३ व १९ जून २१४१ रोजी होणार असून त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४६ मिनिटे दिसणार आहे.

ग्रहणास शुक्रवारी आषाढ पौर्णिमेच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी प्रारंभ होईल. संपूर्ण चंद्रबिंब रात्री १ वाजता पृथ्वीच्या छायेत आल्याने लालसर दिसेल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर रात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल.

Leave a Comment