
सोशल मीडिया हे सेलिब्रिटींना आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोपे आणि प्रभावी माध्यम आहे. सेलिब्रिटी खासकरून ट्विटरवर जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. पण ट्विटरवरील अनेक सेलिब्रिटींचे फॉलोअर्स अचानक कमी झाले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांचे फॉलोअर्सही कमी झाले आहेत.
ट्विटरच्या सफाई अभियानामुळे सेलिब्रिटींचे लाखो फॉलोअर्स झाले कमी
आपल्या सफाई अभियानामुळे हे फॉलोअर्स कमी झाल्याचे ट्विटरने स्पष्ट केले असून अशी अनेक अकाऊंट्स ट्विटरवर आहेत, जी निष्क्रिय आणि लॉक्ड आहेत. ट्विटरने अशा अकाऊंट्सला बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे अमिताभ बच्चन यांचे ४,२४,०००, शाहरुख खानचे ३,६२,१४१ आणि सलमान खानचे ३,४०,८८४ फॉलोअर्स कमी झाले आहेत.
याबाबत ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या सोशलब्लेड डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आमीर खानचे ३,१६,९००, प्रियंका चोप्राचे ३,५४,८३० आणि दीपिका पादुकोणचे २,८८,२९८ फॉलोअर्स कमी झाले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्विटरने सुरु केलेल्या सफाई अभियानाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
