घराच्या सजावटीसाठी आरशाचा वापर करताना…


आपले प्रतिबिंब दाखविणारा आरसा हे खरे तर प्रसाधन करण्याकरिता वापरले जाणारे मुख्य साधन, पण ह्याचा वापर आजच्या काळामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सजावटी करण्यासाठी देखील केला जाऊ लागला आहे. किंबहुना घराच्या एखाद्या भिंतीवर सुंदर फ्रेममधील निरनिराळ्या आकारांचे आरसे त्या विशिष्ट भिंतीला आगळीच शोभा आणतात. आजच्या ट्रेंड्सप्रमाणे घराच्या सजावटीसाठी आरसे वापरताना, त्याचं आकार, किंवा फ्रेमवर्क मध्येही अनेक तऱ्हेचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या घराच्या इतर सजावटीला साजेसे पर्याय आपण निवडू शकतो. हल्लीच्या काळामध्ये सिरॅमिक, लाकूड, किंवा अनेक तऱ्हेच्या धातूंचा वापर करून फ्रेम्स तयार केल्या जात असतात. तसेच ह्या फ्रेम्स अनेक तऱ्हेच्या रंगांमध्ये आणि आकारांमध्ये उपलब्ध असल्याने आरसे निवडताना आपल्या कल्पकतेला पुष्कळ वाव मिळतो.

आजकाल जुन्या पद्धतींचे, कोरीव काम केलेल्या फ्रेम्सचे आरसे फारसे चलनात नाहीत. आजकाल ‘अँटिक’ दिसणारे ब्रास फिनिशिंग, किंवा सॉलिड गोल्डन रंगामधील फ्रेम्सना जास्त पसंती मिळत आहे. तसेच आरश्यांच्या फ्रेम्सवर अनेक तऱ्हेचे ‘अॅब्सट्रक्ट आर्ट’ ही सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. अश्या प्रकारचे आरसे घरामध्ये लावताना त्या ठिकाणचा नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रकाश, त्या आरशामध्ये घरातील कोणत्या भागाचे प्रतिबिंब दिसणार आहे, ह्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. घराच्या ज्या भागामध्ये आपल्याला आरसा लावायचा असेल, तो भाग जर दर्शनी असून, प्रशस्त दिसावा असे वाटत असले, तर मोठ्या आकाराच्या आरशाची निवड करावी.

घरामध्ये आरसे लावताना अनेक जण वास्तूशाश्त्राचा किंवा फेंगशुईचा ही विचार करतात. फेंगशुई नुसार भिंतीवर लावलेल्या आरशामध्ये घराबाहेरील निसर्गाचे प्रतिबिंब दिसत असेल, तर घराच्या वास्तू करिता हे शुभ आणि सकारात्मक उर्जा देणारे आहे. तसेच गोल्डन रंगाच्या गोल फ्रेमवर वर गोल्डन वेलबुट्टी किंवा फुला-पानांची नक्षी असेल, तर ह्यामुळे घरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदते. तसेच घरामध्ये सजावटीसाठी आरसे वापरताना त्यामध्ये आपले संपूर्ण प्रतिबिंब दिसेल असे आरसे वापरावेत. घरामध्ये इतर खोल्यांकडे जाण्यासाठी जर पॅसेज असतील, तर ह्यामध्ये आरसे लावू नयेत. हे आरसे नकारात्मक उर्जा पसरवितात. तसेच घराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा आरसा असणेही शुभ समजले जाते.

Leave a Comment