
सेंट लुइस – जगभरातील जवळपास ९ हजार महिलांनी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ बेबी पावडर वापरल्यानंतर कॅन्सर होतो, असे म्हणत कंपनीच्या विरोधात तक्रार केलेली होती. जॉन्सन अँड जॉन्सनला ६ आठवडे खटला चालल्यानंतर दोषी ठरवण्यात आले. कंपनीला ३२ हजार कोटींचा दंड अमेरिकेतील सेंट लुइस कोर्टाने ठोठावला आहे. ९ हजार पैकी २२ महिलांचा दावा खरा असल्याचे मानत कोर्टाने या महिलांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देश दिले.
जॉन्सन अँड जॉन्सनला ३२ हजार कोटींचा दंड
महिलांच्या तक्रारीत म्हटले आहे की, बेबी पावडरचा तब्बल एक दशक वापर केल्याने ही बाब कॅन्सरसाठी कारणीभूत ठरली. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची तपासणी केली तेव्हा त्यात एसबेस्टसचे तुकडे आढळले. अशा स्थितीत दीर्घकाळापर्यंत पावडरचा वापर केला गेला तर यामुळे नुकसान होते. दरम्यान, निर्णयापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया बरोबर नव्हती. जॉन्सन अँड जॉन्सनने सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे म्हटले आहे. आम्ही या निर्णयामुळे निराश झाला असून याविरोधात दाद मागणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
कोर्टाने या प्रकरणात म्हटले की, जॉन्सन अँड जाॅन्सनने नामांकित कंपनी असल्याने उत्पादनाची गुणवत्ता राखणे आवश्यक होते. पण गुणवत्तेकडे कंपनीने दुर्लक्ष तर केलेच, शिवाय ग्राहकांना धोक्याबाबत सतर्क केेले नाही. १९७० पासून पावडरमध्ये अॅस्बेस्टाॅसचा वापर होत असल्याचे कोर्टात स्पष्ट झाले. पण यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने २०१० मध्ये पावडरच्या सँपलमध्ये अॅस्बेस्टॉस आढळले नाही. कोर्टाच्या मते, या संस्थेने केलेली तपासणीची पद्धत योग्य नव्हती. याआधीही जॉन्सन अँड जॉन्सन उत्पादनाच्या गुणवत्तेला अनुसरून ४ खटल्यात जवळपास २० अब्जचा दंड कंपनीला लागला आहे.
