बीएसएनएलचे इंटरनेट चालणार घरातील केबल टीव्हीवर


नवी दिल्ली : लवकरच आपल्याला आपल्या केबल टीव्हीच्या बिलामध्ये इंटरनेटही मिळू शकेल. कारण केबल ऑपरेटर्सशी बीएसएनएल याबाबत चर्चा आणि करार करीत आहे. बीएसएनएलच्या या पावलाकडे जिओ एफटीटीएच योजनेचा मुकाबल्यासाठी बघितले जात आहे. याबाबत माहिती देताना बीएसएनएलचे मुख्य कार्यकारी संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, टीव्हीधारकांना घरीच केबल टीव्हीवर इंटरनेट देण्याचा विचार आम्ही करीत आहोत. याबाबत दक्षिण आणि पश्चिम भारतात केबल ऑपरेटर्सशी लवकरच करार करण्यात येणार आहेत.

इंटरनेटसाठी यामुळे वेगळी केबल टाकण्याची गरज पडणार नाही. बीएसएनएलचा खर्चही वाचेल व ग्राहकांना केबल टाकण्याचे वेगळे पैसेही द्यावे लागणार नाहीत. टीव्ही स्क्रीनवर ग्राहक इंटरनेट चालवू शकतील. त्यांना त्यासाठी वेगळा की बोर्ड, माउसची गरज पडणार नाही. इंटरनेटमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यांना बीएसएनएलच्या कार्यालयात फोन करण्याची गरज भासणार नाही. ती समस्या केबल ऑपरेटर्स ते दूर करु शकतील. आम्ही पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर विशेष ऑफर देण्याचा विचार आहोत. इंटरनेटचे वेगळे पैसे यासाठी द्यावे लागणार नाहीत. सध्याच्या केबल बिलात त्यांना इंटरनेटची सुविधा मिळेल. याची गतीही चांगली असेल.

अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, देशातील १० कोटींहून अधिक घरांत केबल कनेक्शन आहे. आम्ही या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ग्राहकांपर्यंत पोहोचू. याशिवाय वेगळी केबल टाकून इंटरनेट कनेक्शन देण्याची योजनाही सुरूच राहील. आमची सेवा सुरू होईल, तेव्हा आमचे उत्पन्न आणि नफाही वाढेल.

Leave a Comment