पावसाळ्यामध्ये कपडे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी


सध्या सगळीकडेच पावसाने जोर धरला आहे. पण त्यामुळे आपली कामे काही थांबत नाहीत. अगदी शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुरड्यांपासून, ते काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पावसाला तोंड द्यावे लागत आहे. पावसाच्या हलक्या सारी असोत, किंवा धोधो कोसळणारा पाऊस असो, आपण पाऊस थांबण्याची वाट न पाहता, रस्त्यातील खड्डे, पावसाचे साचलेले पाणी, चिखल, ह्यांना तोंड देत आपापल्या कामांमध्ये गुंतत असतो. पावसामुळे ह्या समस्या उद्भवत असल्या, तरी ह्याच समस्यांच्या सोबत आणखी एक मोठी समस्या असते, ती म्हणजे पावसामध्ये, चिखलाचे पाणी उडून खराब झालेल्या कपड्यांची. हे कपडे स्वच्छ धुणे, ही एक कसरतच असते. त्यातून हवा ओलसर, दमट असल्याने आणि ह्या दिवसांमध्ये उन्हाने दडी मारल्याने, धुतलेले कपडे सुकणे हा ही मोठाच प्रश्न असतो. त्यातून जर कपडा जाडसर असेल, आणि तो व्यवस्थित सुकला नसेल तर कपडा स्वच्छ धुतलेला असूनही त्यातून एक प्रकारची कुबट दुर्गंधी येऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे स्वच्छ धुणे आणि ते दुर्गंधीमुक्त ठेवणे हे जरा अवघड काम होऊन जाते. तसेच कपाटातल्या कोरड्या कपड्यांनाही हा वास येऊ लागतो. हे टाळण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येईल.

कपाटामध्ये असलेल्या भरजरी साड्या, किंवा अन्य किंमती कपडे दमट हवेमुळे येणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्त राहावेत ह्यासाठी ह्या कपड्यांना प्लास्टिकच्या साडी बॅग्जमध्ये व्यवस्थित ठेवणे हा चांगला पर्याय आहे. तसेच अधून मधून हे कपडे कपाटाबाहेर काढून त्यांना थोड्या खुल्या हवेवर राहू द्यावे. त्यामुळे ह्या कपड्यांमध्ये असणारा थोडाफार दमटपणाही निघून जाण्यास मदत होईल. तसेच कपाटाची दारेही काही वेळ खुली राहू देऊ त्यामध्ये हवा खेळू द्यावी. कपाटामध्ये आणि आपण आपल्या कपडे ठेवतो त्या स्टोरेज बॅग्ज मध्ये डांबराच्या गोळ्या असाव्यात.

कपडे धुताना त्या पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातल्याने कपड्यांमधील दुर्गंधी नाहीशी होणे शक्य होते. तसेच कपडे वाळविताना ज्या ठिकाणी हवा खेळती असेल, अश्या ठिकाणी वाळत घालावेत. कपडे संपूर्ण वाळल्यानंतरच त्यांच्या घड्या घालाव्यात. कपड्यांवर मातीचे किंवा चिखलाचे डाग असतील, तर थोड्या थंड पाण्यामध्ये भांडी धुण्याचे लिक्विड जेल आणि एक टेबलस्पून व्हिनेगर घालून कपडे त्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवावेत. त्यानंतर कपडे नेहमीप्रमाणे धुवावेत. कपड्यांवर चिखलाचे डाग असतील, तर घरी आल्यावर त्वरित कपडा धुवून टाकावा. डाग जितके जास्त वाळतील, तितके ते काढण्यास कठीण होत जातील. तसेच कपडे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. कपडे धुताना थंड किंवा कोमट पाणी असावे.

Leave a Comment