जपानमध्ये साजरा होतो बाळांना रडविण्याचा नाकीझुमो उत्सव


रडणाऱ्या लहान मुलांना शांत करताना आईवडीलांची कशी त्रेधा उडते हे नेहमीच दिसणारे दृश्य. मुलांनी रडून आकांत मांडू नये यासाठी परोपरी प्रयत्न घराघरातून सुरु असतात. जपान हा अनोखा देश याबाबतीतही जरा हटके आहे. येथे दरवर्षी वसंत ऋतूमध्ये एक उत्सव साजरा केला जोतो, नाकीझुमो नावाने साजरा होणारा हा उत्सव खास लहान मुलांना रडविण्यासाठी साजरा केला जातो आणि मुलांना रडविण्यासाठी जपानच्या सुमो पहिलवानांची पगारी नेमणूक केली जाते.


या उत्सवामागाचे कारण आहे ते दुष्ट शक्तींना पळवून लावायचे आणि लहानग्याला आरोग्य मिळावे. हा उत्सव साधारण बालकदिनाच्या आसपास साजरा होतो. नाकु को वा सोदात्सू म्हणजे रडणारी मुले लवकर मोठी होतात अश्या अर्थाची म्हण जपानमध्ये आहे. या उत्सवात सर्वप्रथम रडणाऱ्या मुलाला बक्षीस दिले जाते. समजा दोन मुले एकदमच रडायला लागली तर ज्याने अधिक जोरात भोकाड पसरले त्याला विजयी मानले जाते. विशेष म्हणजे या सुमो पैलवानांच्या हातातील मूल हुंदके द्यायला लागले कि त्याला शुभेच्छा आणि अधिक जोराने रडावे यासाठी प्रार्थना सुरु होतात.

मुले कधी कशी वागतील याचा अंदाज कुणीच करू शकत नाही. या उत्सवात सामील झालेली मुलेही त्याला अपवाद नाहीत. काही मुले इतक्या कोलाहलात शांत झोपून टाकतात तर काही रडण्याऐवजी हसायला लागतात. असल्या मुलांना मग रेफ्री सैतानाचे भयंकर मुखवटे घालून घाबरवतात आणि मुलांना भोकाड पसरायला भाग पडतात. हि प्रथा गेली ४०० वर्षे सुरु असून जपानभर पाळली जाते.

Leave a Comment