पावसाळ्यात अवश्य करा मांडू गडाची सैर


अनेक पर्यटकांना पावसाळ्यात भटकंती करायला मनापासून आवडते. पावसाळी किंवा वर्षा पर्यटनासाठी भारतात अनेक जागा आहेत. या काळात धरती नव्या नवरीसारखी हिरवा शालू लेऊन सजलेली असतेच पण तिचे सौंदर्य धुक्याच्या पडद्याआडून आणखी मोहक दिसते. मध्यप्रदेशातील ऐतिहासिक मांडू गड पावसाळ्यात अवश्य पहावा असे ठिकाण आहे. या ठिकाणाला सिटी ऑफ जॉय असेही नाव पर्यटकांनी दिले आहे.

या गडाभोवती अधुऱ्या प्रेमकथेचे वलय आहे. राणी रूपमती आणि बाज बहाद्दर याच्या प्रेमाची कहाणी या गडाशी जोडली गेली आहे. रूपमती माळवा येथील गायिका होती आणि बाज्बाहाद्दार तिच्या आवाजावर फिदा होता. रूपमती नावाप्रमाणे सुंदर होती. बाजबहाद्दराने तिला मांडू गडावर आणले आणि तिच्याशी आंतरधर्मीय विवाह करून तिला राणी बनविले असे सांगतात. राजा अकबराने राणी रूपमतीच्या रुपाची तारीफ ऐकली आणि बाजबहाद्दर याला रूपमतीला दिल्लीच्या महालात पाठविण्याचा आदेश दिला. बाज बहाद्दर याने अकबराला तुझी राणी इकडे पाठव असा निरोप दिल्यामुळे चिडलेल्या अकबराने मांडूवर हल्ला चढविण्यासाठी अधमखान याला सैन्यासह रवाना केले. त्याने बाजबहाद्दरचा युद्धात पराभव करून त्याला ठार केले. राणी रुपमतीने तीन दिवसाची मुदत मागितली आणि हिऱ्याचे चूर्ण खाऊन प्राण दिला. त्यामुळे हि प्रेमकहाणी अधुरी राहिली.


राणी रूपमती रोज नर्मदा दर्शन केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे. म्हणून बाज बहाद्दराने येथे उंचावर एक महाल बनविला त्याच्या खिडकीतून रूपमती नर्मदा दर्शन करत असे. कृत्रिम तलावांच्या मध्ये बांधला गेलेला जहाज महाल, रूपमती महाल हि येथील मुख्य आकर्षणे. जहाज महाल दुरून खरोखर एखाद्या जहाजप्रमाणे भासतो. हा महाल एका बाजूला थोडा झुकल्यामुळे थोडा झोपाळ्यासारखा दिसतो म्हणून याला हिंदोळा महाल असेही म्हणतात. गडावरून पावसाळ्यात खालील दृशे पाहणे फारच आनंददायी असते, चोहोबाजूने पसरलेली हिरवाई, धुक्याचा नाजूक पडदा गडाचे सौंदर्य आणखीन मोहक बनवितो.

Leave a Comment