पावसाळ्यामध्ये घरच्या घरी करता येतील हे वर्कआउट्स


आपल्यापैकी काही जणांना पाऊस खूप आवडतो, तर काहींना पाऊस अगदी नकोसा असतो. पण खरे सांगायचे झाले तर प्रत्येक ऋतू बदलला, की त्यानुसार आपल्या दिनक्रमामध्ये देखील थोडे फार बदल होत असतात. व्यायामाच्या निमित्ताने आवर्जून घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत तर हे नक्कीच खरे आहे. जे लोक जिम मध्ये जातात त्यांच्यासाठी विशेष प्रश्न उद्भवत नाही, पण बाहेर पळायला, किंवा सायकलिंग किंवा तत्सम व्यायामासाठी जाणाऱ्यांची मात्र पाऊस ऐनवेळेला फजिती करीत असतो. अनके जण तर हवामानाचा एकंदर कल पाहूनच बाहेर पडणे योग्य आहे किंवा नाही ह्याचा निर्णय घेत असतात. आणि जर पाऊस कोसळू लागला तर त्यादिवशीचा वर्कआउट होणे शक्य होत नाही. पावसाळा जोवर सुरु राहतो, तोवर आपले वर्कआउटचे वेळापत्रक डळमळत राहते. पण आता बाहेर पाऊस पडत असला, तरी आपला वर्कआउट आपण अनेक प्रकारे घरच्या घरी करू शकतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जिम मध्ये जाऊन वर्क आउट करणे हा सर्वात सोपा उपाय आहे. त्यासाठी आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या जवळ असलेल्या जिमची निवड करावी, म्हणजे जाण्यायेण्यात फारसा वेळ वाया जाणार नाही, तसेच पाउस पडत असला, तरी जिमला पोहोचणे अवघड होणार नाही. जिममध्ये व्यायाम करणार असल्यास कार्डियो आणि वेट ट्रेनिंग हे दोन्ही करावे. जिममध्ये असणाऱ्या ट्रेनर्सचे मार्गदर्शन ह्या वेळी उपयोगी पडते. आपल्यासाठी योग्य असा वर्कआउट ट्रेनर आपल्यासाठी नक्कीच सुचवू शकतात, त्यामुळे त्यांचा सल्ला अवश्य विचारात घ्यावा. घरच्या घरी योगासने करणे हा देखील वर्कआउटचा चांगला पर्याय आहे. आजकाल बाजारामध्ये कार्डियो वर्क आउट, तसेच योगासाने, पिलाटीस यांसारख्या व्यायामप्रकारच्या व्हिडियो सीडी, किंवा यूट्यूब वर अनेक व्हिडीयोज उपलब्ध आहेत. ह्या व्हिडीयोजच्या मदतीने घरच्या घरी आपल्याला हवा तसा वर्क आउट करणे सहज शक्य होते.

अनेकांना नृत्याची आवड असते. त्यामध्ये त्यांना चांगली गती देखील असते. आपल्या ह्याच कौशल्याचा तुम्ही वर्क आउट म्हणूनही वापर करु शकता. आजकाल अनेक डान्स स्टुडियोज, नृत्य आणि व्यायाम ह्या दुहेरी तत्वांवर आधारित आहेत. त्यामुळे जर नृत्याची आवड असेल, तर आपण आपल्याला आवडेल तो नृत्य प्रकार डान्स स्टुडियो मध्ये शिकू शकता, किंवा घरच्या घरी व्हिडीयोजच्या माध्यमातून शिकू शकता. नृत्य फ्री स्टाईल, म्हणजेच आपल्याला हवे तसे, आणि ‘कोरियोग्राफ्ड’, म्हणजेच नृत्य दिग्दर्शकाने दाखविल्याप्रमाणे असे दोन्ही प्रकारचे असू शकते. घरच्या घरी जर हा व्यायाम करायचा असेल, तर आपली आवडती, द्रुत लयीतील गाणी प्ले लिस्टद्वारे लावून त्यांच्या तालावर नृत्य करावे. डान्स वर्कआउट किमान तीस मिनिटे करणे आवश्यक आहे.

आजकाल मोबाईल फोन्स वर देखील अनेक फिटनेस अॅप्स उपलब्ध आहेत. त्यांच्या सहायाने देखील घरच्या घरी वर्कआउट करणे शक्य आहे. ह्याशिवाय दोरीवरच्या उड्या मारणे, स्टेशनरी सायकल वर सायकलिंग करणे, हे व्यायामप्रकार घरच्या घरी वर्क आउट म्हणून केले जाऊ शकतात. ह्यांच्या जोडीने रेझिस्टन्स बँडस् च्या मदतीने स्ट्रेंग्थ ट्रेनिंगही घरच्याघरी करता येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment