पंजाब पुत्तर जगदीपसिंग आहे जगातला सर्वात उंच पोलीस


पंजाब पोलिसांच्या वाहतूक शाखेतील पोलीस जगदीपसिंग जगातील सर्वात उंच पोलीस ठरला आहे. जगदीपची उंची आहे ७ फुट ६ इंच. भारताचा पहिलवान खलीपेक्षाही जगदीप उंचीला अधिक आहे. या उंचीचा फायदा इतकाच कि देशभर त्याला सेलिब्रिटीसारखी वागणूक दिली जाते. मात्र इतक्या उंचीचे तोटे अनेक आहेत. गेली १८ वर्षे पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय जगदीपला १९ साईजचा बूट लागतो आणि भारतात तो सहजासहजी मिळत नाही. मग ऑर्डर देऊन खास बूट बनवून घ्यावा लागतो.


जी गोष्ट बुटाची तीच कपड्यांची. जगदीपला तयार गणवेश कधीच मिळत नाही तर ते खास शिवून घ्यावे लागतात तसेच अन्य रोजच्या वापराचे तयार कपडे घेण्याचे सुख त्याला मिळत नाही. दुसरीकडे कुठे गेले तर झोपणे, बाथरूम सगळ्याची अडचण होते. इतकेच काय लग्न करायचे तर त्याला उंच मुलगी मिळेना अखेर अशी एक मुलगी मिळाली. जगदीपची पत्नी सुखबीर ५ फुट ११ इंच उंच आहे आणि तिला नवऱ्याची उंची आणि त्याला मिळत असलेले सेलेब्रेटी स्टेट्स याचा अभिमान वाटतो.

जगदीपची आई सांगते, लहानपणापासून त्याची चण मोठीच आहे आणि शालेय जीवनात त्याला यामुळे मुले सारखी चिडवत असत पण त्याने त्याचे कधीच वाईट वाटून घेतले नाही आणि आता तर त्याला त्याच्या उंचीचा अभिमानच वाटतो कारण तीच त्याची ओळख बनली आहे.