जवळपास दीड कोटीला विकली गेली ‘हि’ सेकंड हँड बॅग


सध्या फॅशन मार्केटमध्ये स्टेट्स सिम्बल असलेल्या हमीस हिमालय बर्केन बॅगला खूप मागणी आहे. सेलिब्रिटी आणि श्रीमंत महिलांसाठी ही बॅग घेऊन मिरवणे म्हणजे स्टेटस सिम्बल समजल जाते, पण ही बॅग विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तिची विक्री काही मोजक्याच ग्राहकांना केली जाते. ही बॅग ज्या व्यक्तीला विकली जाणार आहे तिची समाजातील पत आधी पाहिली जाते, भली मोठी ‘वेटिंग लिस्ट’ या बॅग खरेदी करण्यासाठी आहे. तर लंडनमध्ये नुकताच अशा सेकंड हँड बर्केन बॅगचा लिलाव पार पडला. नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका लिलावात सेकंड हँड बर्केन बॅगवर चक्क दीड कोटींची बोली लावण्यात आली आहे.

दरम्यान २०१६ मध्ये चक्क २, ७९,००० युरो म्हणजे जवळपास अडीच कोटींहून अधिक किंमतीत हमीस हिमालय बर्केन बॅग विकली गेल्याचे ‘ख्रिस्टीन’च्या अहवलातून समोर आले होते. निलो मगरीच्या कातड्यापासून ही बॅग तयार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यावर पांढरे सोने आणि हिरेही जडवण्यात आले होते. ही बॅग हाँगकाँगमधील एका व्यक्तीने खरेदी केली होती. नुकतीच लंडनमधील लिलावात विकली गेलेली बर्केन बॅग ही दहा वर्षे जुनी होती. ही बॅग दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या मगरीच्या कातडीपासून तयार करण्यात आली होती. फ्रेंचमधील एका लक्झरी फॅशन हाऊस हमीसने १९८१ मध्ये या बॅग डिझाईन केल्या. या बॅगना बर्केन बॅग हे नाव गायक अभिनेत्री जेन बर्केन हिच्या नावावरून देण्यात आले.

सेकंड हँड बॅग्सचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत खूपच वाढला आहे. यातील उलाढाल सध्याच्या घडीला दोन अब्जांहून अधिक आहे. या बॅग्सची निर्मिती मोजकीच असल्याने या बॅग्सना सेकंड हँड मार्केटमध्ये मोठी मागणी असल्यामुळे सोने किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणूकीपेक्षा या बॅग्समध्ये गुंतवणूक करणे जास्त फलदायी असल्याचे अनेकजणांचे म्हणणे आहे.

Leave a Comment